देशव्यापी लोक डाऊनमुळे देसूर येथे अडकून पडलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चौघा शेतमजुरांना श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कोगनोळी नाक्यापर्यंत सुखरूप नेऊन पोचविले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वी देशव्यापी लोक जाहीर केला. त्यामुळे घराबाहेर पडून परराज्यात गेलेले अनेक नागरिक अडचणीत आले आहेत. याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील देसूर (ता. बेळगाव) येथे कामास असलेल्या बाळासाहेब पाटील, बाळू गुरव, बाळू शंकर पाटील व बाळू शंकर कांबळे या शेतमजुरांची लॉक डाऊनमुळे कोंडी झाली होती. यापूर्वी 31 मार्चपर्यंत लाॅक डाऊन असल्यामुळे हे मजूर त्यानंतर आपल्या गावी जाणार होते. मात्र लाॅक डाऊनचा कालावधी आता 14 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे घरी जायचे कसे? असा प्रश्न या शेतमजूरांना पडला होता. तथापि श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावच्या कार्यकर्त्यांनी त्यांची या कोंडीतून सुटका केली.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम सेना (हिं) बेळगावच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी स्वखर्चाने कार गाडीतून संबंधित चारही शेतमजुरांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेनजीकच्या कोगनोळी नाक्यापर्यंत सुखरूप नेऊन पोहोचविले. खरेतर संबंधित शेतमजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याचे ठरले होते. तथापि सांगली व कोल्हापूर येथील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोगनोळी नाका येथे दोन्ही बाजूच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असल्याने शेतमजुरांना नाईलाजाने तेथेच सोडण्यात आले. तेथून ते शेतमजूर आपल्या नातलगांच्या वाहनातून गावी निघून गेले.
याकामी शंकर पाटील, महेश जाधव, संतोष धुडूम, निपाणीचे ॲड. निलेश हत्ती व श्रीनिवास चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. देशव्यापी बंद असूनही पोलीस परवानगीचे पत्र हाती असल्यामुळे देसूरहून कोगनोळी नाक्यापर्यंतच्या प्रवासात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण आली नाही. या कार्यकर्त्यांनी काल गुरुवारी देखील बेळगाव रेल्वेस्थानकावर अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील चार प्रवाशांना कोल्हापूर बसस्थानकापर्यंत सुखरूप नेऊन पोहोचविले होते.