आम्हाला तुमचे जेवणखाण कांहीही नको.. आमचे आई-वडील आमचे कुटुंब आमची वाट बघत आहे… आम्हाला येथून जाऊद्या, ही मागणी आहे बेंगलोरहून राजस्थानच्या दिशेने पायी निघालेल्या राजस्थानमधील कामगारांची. ज्यांना कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी सोमवारी सकाळी वाटेत अडवून बंदिस्त केले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बेंगलोर आणि आसपासच्या भागातील सुमारे 300 ते 400 कामगार (मजूर) काम बंद झाल्यामुळे तसेच कोणतेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे जथ्थाने बेंगलोर होऊन राजस्थानच्या दिशेने पायी चालत निघाले होते. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थलांतरावर बंदी घालण्यात आली असल्यामुळे बेळगाव पोलिसांनी या कामगाराच्या जथ्थ्याला सोमवारी सकाळी शहरानजीक महामार्गावर अडवले. पोलीसांनी त्यानंतर या सर्व कामगारांची त्यांच्या बायका पोरांसह वाहनांमधून थेट नेहरूनगर येथील समाज कल्याण खात्याच्या मॅट्रिकपूर्व मुलांच्या निवासी शाळेत रवानगी केली.
सदर निवासी शाळेत या कामगारांसाठी नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि आपल्या घरी राजस्थानला जाण्यासाठी या कामगारांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आम्हाला तुमचे जेवण नको, नाश्ता नको, आम्हाला काहीही करून घरी जायचे आहे आम्हाला घरी जाऊ द्या, आमचे आई-वडील आमचे कुटुंबीय आमची वाट बघत आहेत, आमची सरकारला विनंती आहे आमचे जे काही चेकअप करायचे आहे ते करा परंतु आम्हाला घरी जाऊ द्या, असा एकच हेका या कामगारांनी लावला होता.
दरम्यान पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला सध्या स्थलांतरास का बंदी आहे? हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नाश्ता दोन वेळचे जेवण सर्वकाही दिले जाईल पण काही दिवस तुम्हाला गावाकडे जाता येणार नाही, असेही समजावले. तथापि याचा कोणताच परिणाम त्या कामगारांवर झाला नाही.आम्हाला भात आमटी नको चपाती हवी अशी मागणी त्यांनी केली.
राजस्थानी कामगारांच्या या समूहाने अधिकच गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे शेवटी पोलीसांना नाईलाजाने निवासी शाळेच्या इमारतीला टाळे ठोकून त्या कामगारांना बंदिस्त करावे लागले.