लॉक डाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने घरपोच भाजीपाला उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे. भाजीपाला विक्री करणाऱ्या संबंधित वाहनावर कन्नडसह मराठी फलक देखील लावण्याची मागणी केली जात आहे.
एपीएमसीतर्फे लॉकडाऊन काळात घरपोच भाजीपाला नागरिकांना मिळावा यासाठी वाहनांची व्यवस्था केलेली व्यवस्था स्वागतार्ह आहे. ही वाहने बेळगाव शहरातील विविध प्रभागात सेवा देणार आहेत, पण त्या वाहनांवर जे फलक लावण्यात आलेत ते पूर्ण कन्नड भाषेत आहेत. बेळगाव हे मराठी बहुभाषिक असून याठिकाणी देवाण घेवाण ही मराठी भाषिकातून होणार असताना इथं मराठीला स्थान का नाही? असा प्रश्न केला जात आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणीबाणीची आहे. किमान या परिस्थितीत तरी प्रशासनाने मराठी भाषेचा दुस्वास करू नये. प्रत्येक गोष्टीत कन्नड भाषेचा अट्टाहास धरण्याचे आपले वर्तन राज्य सरकार आणि पर्यायाने जिल्हा प्रशासनाने जनहितार्थ आतातरी बाजूला सारावे. तसेच भाजी विक्री करण्यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये फिरणाऱ्या वाहनांवर कन्नडसह मराठी भाषेचेही फलक लावावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे.
एपीएमसी सेक्रेटरींनी यात लक्ष घालावं. त्याचप्रमाणे स्वतःला मराठी लोकांचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्यांनी निद्रावस्थेतून जागे व्हावे. केवळ निवडणुकांच्या वेळी मराठी प्रेम न दाखविता प्रत्यक्ष कृती कृतीतून ते दाखवून द्यावे आणि भाजी विक्री करणाऱ्या वाहनावर तीनही भाषेतील फलक लावण्याची व्यवस्था करावी, असेही सुचविण्यात आले आहे.
Good going,atleast fighting against corona ,people and administrator in belgaum are working together.good news.