महिलांनी केवळ घर आणि संसार सांभाळून आपल्या इच्छा अपूर्ण ठेवू नयेत. महिलांनाही स्वप्न असते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी काबाडकष्ट करावे. स्वतःचे अस्तित्व गमावू नये ,आपल्या मतावर ठाम राहून आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहिल्यास त्यांना सर्वजणच प्रोत्साहन देतील’ असे मत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वरिष्ट विभागीय अधिकारी सौ पोर्णिमा गायतोंडे यांनी बेळगाव लाइव्ह शी बोलताना व्यक्त केले.
1988 साली न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट म्हणून रुजू झालेल्या गायतोंडे यांचे शिक्षण एम बी ए झाले असून त्या 15 जून 1992 पासून भारतीय आयुर्विमा महामंडळात रुजू झाल्या आहेत.असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून प्रशिक्षण झाल्यानंतर पुणे, मुंबई,गोवा येथे यशस्वी रित्या कार्य करून आता त्या बेळगावात कार्यरत आहेत .
‘भारतीय आयुर्विमा महामंडळात शाखा कार्यालयात , विभागीय कार्यालयात ,झोनल कार्यालयात आणि केंद्रीय कार्यालयात ऑपरेशन्स ,एच आर डी, इन्व्हेस्टमेंट आणि एडवर्टाइजमेंट अशा विविध खात्यामध्ये कार्य करून वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी मार्केटिंग मध्ये जबाबदारी स्वीकारली आहे. एक यशस्वी अधिकारी, नेहमीच सहकारी यांना सहकार्य करणारे उमदे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते .आपल्या यशात आपल्या पतींचे मोठे प्रोत्साहन आपल्याला मिळाले आहे असे त्या अभिमानाने सांगतात.
‘महिलांनी आता विविध क्षेत्रात पदार्पण करून ती क्षेत्रे पादाक्रांत करावीत असा संदेश गायतोंडे यांनी महिला दिनानिमित्त दिलाय.