एकीकडे महाराष्ट्र सरकारनेबेळगावातील मराठी संस्थांना दहा कोटींची मदत जाहीर केली असताना कर्नाटक सरकारने आजच मराठी साहित्य संमेलन भरवणाऱ्या आयोजकांना नोटिशी बजावल्या आहेत.
सालाबादप्रमाणे रीतसर पोलीस परवानगी घेऊन आयोजित केलेल्या 14 व्या कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर संमेलनाद्वारे भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवून नोटीस बजावण्यातद्वारे दडपशाही करण्याचा प्रकार केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कुद्रेमनी (ता. जि. बेळगाव) येथील बलभीम साहित्य संघातर्फे सालाबादप्रमाणे गेल्या 11 जानेवारी 2020 रोजी 14 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी संमेलनाच्या आयोजनासाठी काकती पोलिस स्थानकाकडून रीतसर परवानगीही घेण्यात आली होती. त्यावेळी सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी पोलिसांचेही उत्तम सहकार्य लाभल्यामुळे आयोजकांकडून आभार प्रकट करण्यात आले होते. तथापि आता संमेलन समाप्त होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी संपुष्टात येत असताना कुद्रेमनी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना पोलिस खात्याकडून नोटिस बजावण्यात आली आहे.
नागेश निंगाप्पा राजगोळकर, काशिनाथ अपुनी गुरव, मोहन केशव शिंदे, महादेव वैजू गुरव, शिवाजी महादेव गुरव आणि गणपती पांडुरंग बडसकर अशी नोटिसा बजावण्यात आलेल्या आयोजकांची नावे आहेत.
14 व्या कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलनादरम्यान सहभागी वक्त्यांनी सीमाप्रश्नाचा उल्लेख करण्याबरोबरच भाषिक तेढ निर्माण करणारी भाषणे केली आहेत. यामुळे कायद्याचा भंग झाला असल्याचे नमूद करून सीआरपीसी 1973 अन्वय संबंधित सहाजणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सहा महिन्यांचा 50 हजार रुपयांचा बाॅन्ड आणि दोन जामिनांसह संबंधितांना येत्या गुरुवार दि. 12 मार्च 2020 रोजी पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
कुद्रेमनी साहित्य संमेलनास स्वतःच परवानगी देऊन आता आयोजकांविरुद्ध स्वतःच नोटीस जारी करण्याच्या पोलीस खात्याच्या या कृतीचा आणि दडपशाही वृत्तीचा तीव्र निषेध केला जात आहे.