कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे भाजी मार्केट असणाऱ्या बेळगाव एपीएमसी मार्केटला शिस्त लावण्याची जबाबदारी आता पोलीस खात्याकडे सोपविण्यात आल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अनावश्यक गर्दीला आळा बसला आहे.
प्राणघातक कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही सूचना जारी केल्या असून गर्दी करू नका, सामाजिक अंतर ठेवा या त्यापैकी कांही महत्त्वाच्या सूचना आहेत. तथापि या सूचना जारी करून 5 – 6 दिवस उलटले तरीही बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये या सूचनांची अंमलबजावणी होत नव्हती. बेळगाव महापालिका आणि एपीएमसी व्यवस्थापन यापैकी कोणालाच या मार्केटमध्ये येणारे शेतकरी, व्यापारी आणि नागरिक दाद न देता मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने याठिकाणी शिस्त लावण्याचे काम पोलीस खात्याकडे सोपविले आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांनी एपीएमसी येथील व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भातील सूचनांच्या अंमलबजावणीचे महत्त्व त्यांना पटवून दिले.
सध्या एपीएमसी येथे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी भाजीविक्रेते आणि ग्राहकांना शिस्त लावण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. भाजी मार्केटमध्ये सामाजिक अंतर ठेवून भाजीपाला खरेदी – विक्रीचा व्यवहार करण्याचा कडक आदेश देण्यात आला आहे. यासाठी मार्किंग करण्यात आले असून या नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. परिणामी गेल्या दोन दिवसापूर्वी याठिकाणी पहावयास मिळणाऱ्या प्रचंड गर्दीला आळा बसला आहे. तसेच नेहमी गजबजलेले असणारे हे भाजीमार्केट सध्या सामसूम दिसत आहे. सध्या भाजी मार्केट सुरू झाल्यानंतर पोलिस सर्वत्र पाहणी करताना तर अधिकारीवर्ग एका बाजूला सावलीत बसून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
एपीएमसी भाजी मार्केटमधून भाजी खरेदी करण्यासाठी शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांना सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. ही मुभा देण्याबरोबरच किरकोळ भाजी विक्रेत्यांनी गर्दी न करता एकेकाने येऊन एपीएमसी येथून भाजीपाला खरेदी करावी, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीला घेऊन येण्यासाठी दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
दरम्यान अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या एपीएमसी भाजी मार्केटमधील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी एपीएमसी भाजी मार्केटपर्यंत येऊ नये यासाठी प्रशासनाकडून शहरातील सर्व 58 वॉर्डांमध्ये वाहनांमधून घरपोच भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किरकोळ भाजी विक्रेत्यांना एका जागी बसून भाजी विक्री न करता गल्लोगल्ली फिरून भाजी विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.