कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून आंतरराज्य व आंतरजिल्हा जिल्हा बससेवा बंद करण्यात आल्यामुळे कर्नाटक वायव्य परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागाला तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावसह राज्यातील नऊ जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत लाॅक डाऊन करण्यात आले आहे. तसेच बस मधून प्रवाशांची वाहतूक वाढत असल्याने गेल्या शुक्रवार रात्री 8 वाजल्यापासून आंतरराज्य बससेवा आणि रविवारी जनता कर्फ्यूमुळे संपूर्ण बस सेवा बंद करण्यात आली होती. सोमवारी देखील एकही बस रस्त्यावर धावली नाही. आता जिल्ह्यात लाॅक डाऊन असल्याने 31 मार्चपर्यंत हीच परिस्थिती असणार आहे.
वायव्य परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागात सात डेपो आहेत. यापैकी बेळगावात चार तर रामदुर्ग खानापूर व सौंदती येथे प्रत्येकी एक डेपो आहे. या डेपोंमधून 750 हून अधिक बसगाड्या धावतात.
या बसेसच्या सुमारे 2711 फेऱ्या होतात. तथापि बंदमुळे गेल्या दोन दिवसांपासून एकही बस रस्त्यावर धावलेली नाही. बेळगावमधून महाराष्ट्र व गोव्यात रोज 254 बस फेऱ्या होतात. मात्र आंतरराज्य बस वाहतूक बंदीमुळे या फेऱ्याही बंद झाल्या आहेत. या पद्धतीने बस सेवा बंद असल्यामुळे वायव्य परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागाला कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.