जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासेल म्हणून नागरिक अस्वस्थ असताना तुमच्या दारात भाजी पाला पोहोचेल अशी हमी देत आमदार अनिल बेनके बेळगाव शहरातील नागरिकांना हमी देत दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला पोहोचवण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षतर्फे शनिवारपासून सुमारे 50 ध्वनिक्षेपक अर्थात स्पीकरद्वारे कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी चव्हाट गल्ली येथील आपल्या पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी शुक्रवारी ही माहिती दिली. कोरोना विषाणूने जगभरासह आता आपल्या देशातही थैमान घालण्यास सुरुवात केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉक डाऊन जाहीर केला आहे. तेंव्हा कोणीही घराबाहेर पडू नये. गरजेच्या सर्व जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घरपोच करण्याची व्यवस्था सरकारने केलेली आहे. असे सांगून कोरोना विषाणू प्रादुर्भावास संदर्भातील जनजागृतीसाठी आता सुमारे 50 स्पीकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पीकर द्वारे ऑडिओ रेकॉर्डिंग लावून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
या उपक्रमात फक्त भारतीय जनता पक्षाच्या नाही तर सर्व पक्षांच्या व संघटनेच्या कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे. आपण सर्वांनी संघटितपणे या विषाणूपासून बेळगावचे रक्षण करायचे आहे. यासाठी कोणीही घराबाहेर पडू नका, गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे. “कोरोना” साठी खबरदारीचे उपाय तसेच शासनाच्या घरपोच जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला पोहोचवण्याच्या उपक्रमाबाबत अद्यापिही बहुतांश जनता अनभिज्ञ असल्यामुळे स्पीकरद्वारे शहरात जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोविड -19 अर्थात कोरोना विषाणूच्या रोगाने जगभरात हाहाकार माजविला असून या विषाणूच्या महामारीत हजारो लोकांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूने प्रवेश केला आहे. तेंव्हा आपण या देशाचे जबाबदार नागरिक असल्यामुळे देशांतर्गत सुरक्षा सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे. हिच वेळ आहे आपली राष्ट्रनिष्ठा दाखविण्याची, यासाठी घराबाहेर जाऊ नका. आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास आपल्या डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून उपचाराचा सल्ला घ्या, त्याहून अधिक वैद्यकीय सेवेची गरज असल्यास जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधा. आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे कि कोणीही फिरावयास किंवा घरात बसून कंटाळा आला म्हणून घराबाहेर पडू नये. बाजारातून घरी आणलेली जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे बाह्यबाजूने साबणाने स्वच्छ धुऊन वापरा. रोज वर्तमानपत्रे घ्यायचे टाळा. आपण सारे मिळून या संसर्गजन्य रोगाचा सामना करुया. पुढील 10 – 15 दिवस आपल्या कुटुंबासमवेत घरीच थांबून आपल्या कुटुंबाचे व राष्ट्राचे रक्षण करूया, अशा आशयाची जनजागृती शनिवार पासून स्पीकरद्वारे केली जाणार आहे.
#mlaanilbenake
#mlafightagainstcorona
#belgaumLivenews
#lockdownbelgaum