दुबई दौरा करून परतलेल्या 40 जणांमधील बेळगावच्या “त्या” तीन तरुणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या वृत्ताचा बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी इन्कार केला आहे. सखोल वैद्यकीय तपासणी अंती संबंधित त्रयींला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे सिद्ध झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्व राज्यांचे आरोग्य विभाग जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूची अद्ययावत माहिती मिळवत आहेत. पर्यटकांच्या 40 जणांच्या ग्रुपमधून गेल्या 23 फेब्रुवारी रोजी दुबईला जाऊन 1 मार्च रोजी परतलेल्या बेळगावच्या “त्या” तिघाजणांची ओळख उघड करण्यास आरोग्य खात्याने इन्कार केला आहे. सदर 40 जणांच्या ग्रुपमधील पुण्याच्या एका जोडप्याला व त्यांच्या मुलीला तसेच मुंबईतील अन्य दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे सिद्ध झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सदर ग्रुपमध्ये बेळगावच्या तिघांचा समावेश असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केल्यामुळे बेळगावात भीतीचे वातावरण पसरून अफवांना ऊत आला होता. तथापि सखोल वैद्यकीय तपासणी अंती त्या तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. दुबई दौरा करून आलेल्या त्या तिघांची इत्यंभूत माहिती आरोग्य खात्याकडे असून संबंधितांची वैद्यकीय तपासणी झाली असली तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून आणखी कांही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने बेळगाव महापालिका आणि जिल्हा आरोग्य खात्याच्या सहकार्याने खबरदारीच्या आवश्यक सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.