बेळगाव सह देशभरात कोरोनाला हरवण्यासाठी लॉक डाऊन पाळला जात असताना बेळगावात तालुक्यातील किणये गावात लॉक डाऊन सोबत कडक वार देखील पाळण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 31 रोजी हा कडक वार पाळणूक करण्यात येणार असून यानिमित्ताने गावातील देवीवदेवताना साकडं घातलं जाणार आहे.
किणये गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये सर्व ग्रामस्थांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी सकाळी नऊ वाजता गाऱ्हाणं घालण्यात येणार आहे. यानिमित्ताने गावच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार असून बाहेर गावातील कोणीही नातेवाईक मित्रमंडळी वाहनधारकांनी गावात प्रवेश करू नये तसेच गावातील कोणीही बाहेर जाऊ नये असे ठरविण्यात आले आहे.
कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी गावातील मोजकीच पंच मंडळी व हकदार हे देवदेवतांना साकडे घालणार आहेत. पूजा समयी गावकऱ्यांनी गर्दी करु नये असे ठरवण्यात आले असून सर्व ग्रामस्थांनी मात्र कडक वार पाळणूक करावी असे कळविण्यात आले आहे .
पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात असे अनेक वार पाळले जात होते केवळ एक दिवस नव्हे तर आठवडा भर कटबंद वार पाळले जायचे मात्र शहरीकरणा नंतर असे कटबंद वार पाळणे कमी झाले आहे.लॉक डाऊनच्या निमित्ताने सील झालेल्या सीमा आणि शहरात ओसरलेली गर्दी हे देखील आधुनिक पद्धतीचा कट बंद वार पाळणूक आहे अशी मत देखील व्यक्त होऊ लागली आहेत.