कोरोना विषाणूच्या थैमानामुळे बेळगावातील वॉर्डांच्या पुनर्रचनेसह महानगरपालिका निवडणुकीचा मुद्दाच गायब झाला आहे. राज्य शासन व महापालिका यंत्रणा कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधक उपाय योजनांमध्ये व्यस्त झाल्यामुळे महापालिका निवडणूक संबंधित संपूर्ण चर्चाच थांबली असून निवडणूक लांबणीवर पडणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बेळगाव आणि हुबळी – धारवाड महापालिकेच्या वार्ड पुनर्रचना व आरक्षणाबाबतचा उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठाचा निकाल जाहीर होऊन 26 मार्च रोजी सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्यात राज्य शासनाकडून पुनर्रचना व आरक्षणाबाबत अधिसूचना निघाली नाही. नगरविकास मंत्री बराती बसवराज हे गेल्या 7 मार्च रोजी बेळगावला आले होते. त्यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीची संबंधी तयारी महिनाभरात सुरू होईल असे सांगितले होते. ते बेंगलोरला गेल्यानंतर पुनर्रचना व आरक्षणाबाबत अधिसूचना काढली जाण्याची शक्यता होती, तथापि प्रत्यक्षात कांहीच झाले नाही. आता तर कोरोनाचे संकट पाहता इच्छुकांनी महापालिका निवडणुकीची तयारीच बंद केली आहे.
महापालिकेत प्रशासक नियुक्तीला जवळपास एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. आता कोरोनाचे संकट टळल्यानंतरच प्रभाग पुनर्रचना व आरक्षणाबाबत अधिसूचना काढली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर वार्ड पुनर्रचना होईल त्यावर आक्षेप मागून अंतिम वॉर्ड पुनर्रचना जाहीर केली जाईल. हे सर्व झाल्यानंतर प्रभाग आरक्षण जाहीर करून त्यावरील आक्षेप मागविले जातील. ही प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर अंतिम आरक्षण जाहीर करून मग निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामुळे आता पावसाळ्यानंतरच्या बेळगाव महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे.