कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर बेळगावात लष्कराला तैनात करण्यात येणार असल्याच्या वृत्ताचा पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी स्पष्ट इन्कार केला असून पोलीस आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असताना लष्कराला तैनात करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांकडून बेळगावात लष्कर तैनात करण्यात येणार आहे असा मेसेज फक्त ठिकाणांची नावे बदलून फॉरवर्ड केला जात असल्याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची भेट घेतली असता त्यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.
येत्या एप्रिल महिन्याच्या मध्यावधीत देशात आणीबाणी जाहीर होऊन नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी भारतीय लष्कर, ज्येष्ठ नागरिक, एनसीसी व एनएसएस यांची मदत घेतली जाणार असल्याचे जे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे, ते खोटे आणि गैरसमज पसरवणारे आहे असे स्पष्ट करून लष्कराच्या ॲडिशनल जनरल ऑफ पब्लिक इंफॉर्मेशन (एडीजीपीआय) यांनी आपल्या ट्विटद्वारे सोमवारी या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय लष्कराने देखील कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी पुढील महिन्यात देशात आणीबाणी जाहीर करण्यात येणार असल्याच्या सोशल मीडियावरील वृत्तांना खोटे ठरवून त्यांचा इन्कार केला आहे.
लाॅक डाऊनचा कालावधी आणखी वाढविण्यात येणार असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. तसेच कांही प्रसारमाध्यमांकडूनही तशा बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत, याचा कॅबिनेट सेक्रेटरींनी इन्कार केला असून संबंधित बातम्या बिनबुडाच्या असल्याचे सांगितले आहे. प्रेस इफॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) सोमवारी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात अद्यापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. संशयित 21 जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 18 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह अर्थात नकारात्मक आहे. त्याचप्रमाणे उर्वरित 3 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.