कर्नाटक लॉ सोसायटीच्या (के.एल.एस.) राजा लखमगौडा लाॅ कॉलेज ( आर.एल.एल.एस.) बेळगावतर्फे येत्या शुक्रवार दि. 13 ते रविवार दि. 15 मार्च 2020 या कालावधीत तीन दिवसीय 10 व्या एम. के. नंबयार स्मृती राष्ट्रीय पातळीवरील मुट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राजा लखमगौडा लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सदर मुट कोर्ट स्पर्धेत प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा समावेश असणारे एकूण 63 संघ भाग घेणार आहेत. यामध्ये कर्नाटक (17), महाराष्ट्र (4), तामीळनाडू (3), उत्तर प्रदेश (2) आणि तेलंगणा, पश्चिम बंगाल, गोवा, ओडीसा, बिहार, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील प्रत्येकी एका संघाचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी सुमारे 40 सनद प्राप्त वकील आणि महाविद्यालयातील कायदाविषयक प्राध्यापक परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
सदर मुट कोर्ट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ येत्या शुक्रवार दि. 13 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. एम. श्याम प्रसाद उपस्थित राहणार आहेत. केएलएसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील अनंत मंडगी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग आणि पी. एस. सावकार हे उपस्थित राहणार आहेत.
या मुट कोर्ट स्पर्धेचा सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. एम. पाटील उपस्थित राहणार आहेत. सदर रविवारी 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि कर्नाटक लॉ कमिशनचे चेअरमन एस. आर. बन्नूरमठ तसेच उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. एस. पाच्छापूरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस सदर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे समन्वयक सतीश अनीखिंडी, एस. व्ही. गणाचारी, आर. एस. मुतालीक आदी उपस्थित होते.