बेळगाव मटण ओनर्स असोसिएशनने शहरात चरबीसह मटणाचा दर 560 रुपये तर चरबी विना 600 रुपये प्रति किलो असा निश्चित केला असताना कांही दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
बेळगाव मटण ओनर्स असोसिएशनने पंधरा दिवसापूर्वी मटणाच्या दरांमध्ये 20 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे बेळगाव शहरात चरबीसह मटणाचा दर 560 रुपये तर चरबी विना 600 रुपये प्रति किलो असा निश्चित करण्यात आला आहे. तथापि काही मटण दुकानदारांकडून या दराला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. हे मटण दुकानदार आपल्या मर्जीप्रमाणे मटणाचा दर ठरू लागले आहेत.
खडेबाजार परिसरातील कांही दुकानांमध्ये चरबीसह प्रतिकिलो मटणाची विक्री 600 रुपयांनी केली जात आहे . यासंदर्भात जाब विचारल्यास संबंधित ग्राहकाला हवेतर मटण घ्या, अन्यथा निघा, अशा भाषेत उत्तरे दिली जात आहेत. शहापूर येथील एका मटन दुकानदाराकडून चरबीसह मटण 600 रुपये प्रति किलो दराने तर विनाचरबी व काळीज मटणाचा दर 800 रुपये लावण्यात येत आहे. अलीकडेच झालेल्या होळीच्या वेळी देखील अशाच प्रकारे वाढीव दर आकारुन ग्राहकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू होता.
शहरात मटणाचा दर असोसिएशनने निश्चित करुनही कांही दुकानदार मनमानी करत असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे बेळगाव मटन ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी यासंदर्भात गप्प का? असा सवालही केला जात आहे. तेंव्हा संबंधित मटण दुकानदारांवर महापालिकेच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.