बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बुधवारी झालेल्या बोर्डाच्या पहिल्याच सर्वसाधारण बैठकीत अत्याधुनिक बहुमजली पार्किंग तळ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण बैठक नवनिर्वाचित अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी विविध विषयांसह प्रामुख्याने अत्याधुनिक बहुमजली पार्किंग तळाच्या प्रस्तावावर चर्चा होऊन या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. शहरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून मध्यवर्ती भागात पार्किंग तळ उभारण्यासाठी महापालिकेकडे जागा नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कॅन्टोन्मेंट हद्दीत पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी देण्यात आली.
कॅन्टोन्मेंट बोर्डने पार्किंग तळाचा प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा शोध घेऊन शहराच्या पश्चिमेकडील लॉज रोड येथील 37 गुंठे जागा निश्चित केली आहे. वाहनधारकांच्या दृष्टीने ही जागा बाजारपेठे पासून जवळ असल्याने पार्किंगसाठी उपयुक्त असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
सदर बैठकीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त बहुमजली पार्किंग तळ उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आल्यानंतर आता या प्रस्तावाला लष्कराच्या सदर्न कमांडकडून मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.