बेळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी स्पष्ट केले आहे. तथापि एका युवकाला हेतुतः बदनाम करण्याच्या हेतूने कांही समाजकंटकांनी समाज माध्यमांवर म्हणजे सोशल मीडियावर त्याला “कोरोना” झाल्याची अफवा पसरवून त्याची बदनामी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
बेळगावच्या एका युवकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची अफवा सध्या “व्हाट्सअप”वर पसरवली जात आहे. यासंदर्भात संबंधित युवकाने खडेबाजार पोलीस स्थानक आणि सायबर क्राईम पोलिसांकडे रीतसर तक्रार करून बदनामीचा दावा केला आहे. याप्रकरणी अफवा पसरविणाऱ्या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी कर्नाटकात आतापर्यंत एक गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणूसंदर्भात कोणत्याही प्रकारची अर्धवट, खोटी, चुकीची आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवू नये, असे आवाहन बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच अशी अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सोशल मीडियावर बदनाम केलेला युवक बेळगाव शहरातील उपनगरातील असून एका मोठ्या संघटनेचा पदाधिकारी आहे .