“माझ्या आईला सुखरूप घरी पोहोचवा” लेह लडाख येथे लष्करामध्ये मातृभूमीची सेवा करणाऱ्या जवानाने हेल्पलाईनवर मदत मागितली आणि प्रशासनाने सुद्धा त्याने दिलेल्या सादेला प्रतिसाद देत जवानाच्या आईला सुखरूप हलशी (ता. खानापूर) येथे पोचवले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लेह येथे नारायण भेकणे सध्या लष्करात आपले कर्तव्य बजावत आहेत. ते मूळचे खानापूर तालुक्यातील हलशी येथील असून त्यांच्या आई बेळगावला आपल्या मुलीकडे आल्या होत्या. लेहहून नारायण आल्यानंतर ते दोघेही परत हलशीला जाणार होते. परंतु कोरोनाने निर्माण केलेल्या संकटामुळे नारायण भेकणे यांना सुट्टी मिळणे कठीण झाले आहे. तसेच येण्यासाठी कोणतेही वाहतुकीचे साधनही उपलब्ध नव्हते.
नारायण यांच्या आईला हलशी येथे असलेल्या नारायण यांच्या वडिलांची काळजी लागून राहिली होती. त्यामुळे आपल्याला हलशीला जावयाचे आहे, असे त्यांनी नारायणला सांगितले होते. परंतु सध्याच्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत त्या हलशीला पोहोचणार कशा? हा प्रश्न होता. कोरोनामुळे सुट्टी रद्द झाल्याने नारायण येऊं शकत नव्हते, तर दुसरीकडे बससेवा पूर्णपणे बंद झाल्याने त्यांच्या आईला शीला जाता येत नव्हते. परिणामी नारायण यांनी लेह येथून बेळगावच्या हेल्पलाइनशी संपर्क साधला आणि सर्व परिस्थिती कथन केली व आपल्या आईला घरी सोडण्याची विनंती केली.
पार लेहमधून आलेल्या फोनची गांभीर्याने दखल घेत आरोग्याधिकारी डॉ. बी. एन. तुक्कार यांनी तातडीने पावले उचलत पोलिसांशी संपर्क साधला. तसेच जवान नारायण याच्या आईला वर्षीपर्यंत सोडण्याची सूचना केली त्यानुसार पोलिसांनी त्यांना सुखरूपपणे घरी पोहोचले आहे. आपली हाक बेळगावच्या प्रशासनाने ऐकल्याबद्दल जवान नारायण भेकणे यांनी समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत.