कोरोना व्हायरसच्या जगभरातील दहशतीमुळे सध्या तोंडाला लावण्याच्या मास्कना वाढती मागणी आहे. याचा गैरफायदा घेऊन अवाच्या सव्वा दराने मास्कची विक्री करणाऱ्या बेळगावातील 35 मेडिकल स्टोअर्सवर आज शनिवारी व्यवसायिक कर खात्याच्या अंमलबजावणी पथकाने छापे टाकून संबंधित दुकानांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
व्यवसायिक कर खात्याच्या अंमलबजावणी पथकाने आज शनिवारी केलेल्या या कारवाईमुळे मेडिकल स्टोअर अर्थात औषध दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. कोरोना व्हायरसच्या जगभरातील दहशतीची आणि आता हा व्हायरस भारतातही शिरला असल्याच्या भीतीपोटी नागरिक मोठ्या प्रमाणात तोंडाला लावण्याच्या मास्कची खरेदी करू लागले आहेत. याचा गैरफायदा औषध दुकानदार उठवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेंव्हा जर कोणी व्यापारी अव्वाच्या सव्वा दराने तोंडाला लावण्याच्या मास्कची विक्री करत असेल तर नागरिकांनी त्वरित 104 आरोग्य सहाय्यवाणी मदत वाहिनीशी संपर्क साधावा, असे आवाहन कर्नाटक राज्य आरोग्य खात्याने केले आहे.
व्यवसायिक कर खात्याच्या अंमलबजावणी पथकाने गुरुवारी अचानक मोहीम उघडून बेळगाव शहरातील जवळपास 35 मेडिकल शाॅप अर्थात औषध दुकानांवर छापे मारले. त्यावेळी कोरोना व्हायरसची दहशत लक्षात घेऊन संबंधित दुकानदारांकडून ज्यादा किंमत आकारून तोंडाला लावण्याच्या मास्कची विक्री केली जात असल्याचे उघड झाले. ज्या मास्कची किंमत केवळ 20 रुपये आहे, तो मास्क जीएसटी अथवा बिल न लावता 200 रुपयांना विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार काही ठिकाणी अक्षम्य असल्याने संबंधित दुकानदारांना 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती उत्तर विभाग व्यवसायिक कर खात्याचे संयुक्त संचालक के. रामण यांनी दिली आहे.