सामोरी येऊन ठेपलेली मनपाची निवडणूक,विधानसभेत समितीची झालेली पिछेहाट, विविध सरकारी कार्यालयात लोकप्रतिनिधीविना होणारी मराठी माणसाची ससेहोलपट,63 वर्षे जिद्दीने लढलेल्या मराठी माणसाची एकीविना होणारी मानहानी, ही बेळगावच्या सध्याची मराठी माणसाची स्थिती…त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समिती नेत्यांना एकीचा दिलेला अल्टिमेटम तरीही बधिर असणारे समिती नेते. या राजकीय पाश्वभूमीवर सीमा भागातील मराठी माणूस समिती नेत्यांच्या भूमिकेवर लक्ष ठेऊन आहे.
मी मोठा की, तू मोठा ,मी भारी की तू भारी…मी टाकलेला डाव भारी की तुझा डाव भारी या भावनेतून समिती नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्यात मशगुल आहेत.काहींचे लागेबांधे राष्ट्रीय पक्षातील नेत्यांशी आहेत.मराठीचे हित ज्यांच्या हातात आहे ते स्वतःच्याच हितासाठी झटत आहेत.समोर आले की रामराम , पाठ फिरली की मापं काढणे ही मराठी नेत्यांची मानसिकता आहे.
पोलीस स्टेशन असो, की सरकारी कार्यालय कोणत्याही कार्यक्रमाची परवानगी किंवा शासकीय काम असेल तर लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असेल तर परवानगी नाहीतर बाहेरचा रस्ता, अशी झालेली असताना शिल्लक असलेली बेळगाव मनपाची सत्ता मराठी माणसाकडे असणे काळाची गरज आहे. मात्र समिती नेत्यांच्या दुहीमुळे ही सत्ता हातून जाते की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.मनपा निवडणुकीत मराठी विरुद्ध मराठी अश्या लढती झाल्या तर मत विभाजनामुळे मराठी माणसाचा पराभव निश्चित आहे.हे विभाजन टाळायचे असेल तर एका वार्डात एकच मराठी माणूस उभा राहिला पाहिजे.
मागील महिन्यात मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत पुढील दोन महिन्यां नंतरच्या बैठकीत एक होऊन या नाहीतर पर्यायी युवकांचे नेतृत्व उभे करू. असा सज्जड दम दिला होता. अल्टीमेटमचे दोन महिने संपत आलें, मात्र एवढ्या तेव्हढ्याला महाराष्ट्रात धावणाऱ्या समिती नेत्यांनी ठाकरे यांच्या बोलण्याकडे गंभीरपणे लक्ष दिलेले दिसत नाही.
काका, दादा, नाना, भाऊ, साहेब, अण्णा, मामा महत्वाचे नसून मराठी माणूस व त्याच्या भावना महत्वाच्या आहेत मराठी माणसाचा आक्रोश आहे ‘ नेत्यानो आता तरी सुधरा, नाही तर तुम्हाला काळ माफ करणार नाही…’