व्यसनं माणसाला धाडसी बनवतात, तसं लाचारही बनवतात. तंबाखूचे असो तपकीरीचे असो नाहीतर घसा जाळत जाणाऱ्या मदिरेचे असो नशेची गळाभेट घेतल्याशिवाय तल्लप दारांना चैन पडत नाही.
हातावर घेतलेल्या तंबाखूवर चुना मळण्यासाठी प्रसंगी भिकाऱ्याकडेही चुन्याची मागणी करणारे महाभाग आहेत. ओठात सिगरेट ठेऊन जाणाऱ्या येणाऱ्या कडे काडी पेटी मागणारे अग्निहोत्री किती तरी भेटतील. या सगळ्यात दारूची नशा तर काही औरच आहे..
एकेकाळी रॉयल इनफील्ड चालवणारे ज्या तोऱ्यात असायचे, तशी अवस्था तळीरामांची असते.
बेळगावच्या रसिकांची कथा तर काही औरच आहे. पहाटेच्या गडद अंधारातही मदिराक्षिला शोधणारे रसिक अनेक आहेत.शहापूर भागातल्या एका दुकाना बाहेर पहाटेच्या अंधारात पाच ते सहा तळीरामाचा समूह दारू दुकानदार नावाच्या देवाची वाट पहात बसलेले असतात. आपल्या या देवतेला प्रसन्न होण्यासाठी वेळ लागू नये म्हणून या मनमंदिराचे अंगण झाडून लक्ख करून ठेवतात, पाण्याचा शिडकावा करून आराधना करत बसतात. दुकानदार आल्यावर दुकानाची किल्ली स्वतःच घेऊन ते दुकान उघडतात. कचान दारू ग्लासात पडते पाण्याचा थेंब टाकला तर टाकला नाहीतर तसाच ग्लास घश्यात रिता करतात. त्यांनतर त्यांना लागणारी ब्रह्मानंदी टाळी ही कोणत्याही योग्याच्या साधनेपेक्षा कमी नसते.
रात्री 11 नंतर पोलिसांनी दाखवलेल्या बडग्यामुळे, स्टँड वर एका दारू दुकानात बंद शटरच्या खालून, दाता याचकांचा व्यवहार सुरू होतो.शटरच्या खालच्या चार इंच फटीतून हे अमृत नेताना साक्षात तळीराम लोटांगण घालतात. चार दिवस लॉक डाऊन झालं आणि हेमू कलानी चौकातल्या महालाच्या कुलुपाचा सकाळी सकाळी वास घेऊन काही तळी रामानी आपली श्रद्धा कायम असल्याचे दाखवून दिले.एक दिवस ड्राय डे असला तर अस्वस्थ असणारे तळीराम 21 दिवसाचा लॉक डाऊन कोरड्या घशाने घालवू शकत नव्हते.आकाशातील ढगाला चातकाने विनवणी करावी, तशी यांनी सरकार कडे दारू दुकाने उघडी करण्यासाठी विनवणी केली.
दारू बहाद्दर अशी मागणी करत आहेत की, शासनाने ह्या तळीरामांची अडचण ओळखून सेफ डीस्टनस ठेऊन दारू दुकाने उघडी करण्याचा निर्णय घ्यावा. आणि तळीरामांच्या आयुष्यात चैत्रपालवी फुटावी. असं झालं तर चार दिवसं घरात कोंडून घेतलेले तळीराम, आपली तृष्णा भागवून घेतील आणि कल्पनेला वेग देत फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग आकाशात झेप घेतील.