कर्नाटक अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या नूतन सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी सोमवारी कर्नाटक अॅनिमल वेल्फेअर बोर्ड बेळगावचे उपसंचालक चंद्रशेखर यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्यातील भटकी जनावरे आणि गाईगुरे यांच्या चाऱ्याच्या समस्येबाबत चर्चा केली.
बेळगावातील नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध डॉ. सोनाली सरनोबत यांची नुकतीच कर्नाटक ॲनिमल वेल्फेअर बोर्ड अर्थात कर्नाटक पशु कल्याण मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आपल्या अधिकारपदाची सूत्रे हाती घेताच डॉ. सोनाली सर्नोबत यांनी सोमवारी सर्वप्रथम कर्नाटक ॲनिमल वेल्फेअर बोर्ड (के.ए.डब्लू.बी.) बेळगावचे उपसंचालक चंद्रशेखर यांची भेट घेतली. आपल्या या भेटीप्रसंगी डॉ. सरनोबत यांनी उपसंचालकांशी सध्याच्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील भटकी जनावरे आणि गाई गुरांच्या चाऱ्याच्या समस्येविषयी प्रामुख्याने चर्चा केली. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या अनावश्यक हत्त्यांवर नियंत्रण ठेवणे, गोहत्त्येचे बेकायदा प्रकार, जिल्ह्यातील कुकुटपालन व्यवसायाची अवस्था आदी मुद्द्यांवर देखील डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगाव पशु कल्याण मंडळाचे उपसंचालक चंद्रशेखर यांच्याशी सांगोपांग चर्चा केली.
कर्नाटक ॲनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्य यानात्याने गोहत्त्येवर लक्ष ठेवणे, भटक्या जनावरांसाठी पांजरपोळ उभारणे, जनतेला त्रासदायक ठरलेल्या जनावरांचा बंदोबस्त करणे, मुकजनावरांना त्रास देणार्यांवर कारवाईची व्यवस्था करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने मूक जनावरांसाठी अन्य उपाय योजना करणे आदी कामे डॉ. सोनाली सरनोबत यांना करावी लागणार आहेत.