कोरोना विषाणू प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी बेंगलोरसह राज्याच्या इतर भागातून आलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आदी ठिकाणच्या 1 हजार स्थलांतरित लोकांसाठी बेळगावात सामूहिक काॅरन्टाईन व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी यांनी मंगळवारी दिली.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि लॉक डाऊनसंदर्भात बेळगाव सर्किट हाऊस येथे जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी बोमनहळ्ळी बोलत होते. बेळगावमध्ये सुमारे 1 हजार स्थलांतरित लोकांसाठी सामूहिक काॅरन्टाईनची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणीसह जेवणखाण वगैरेची व्यवस्था देखील केली आहे. बेळगाव प्रमाणेच बैलहोंगल, कित्तूर, हुक्केरी या ठिकाणीदेखील सामूहिक काॅरन्टाईनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगून हाती घेतलेल्या अन्य उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिली.
यावेळी जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेण्याबरोबरच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन केले. तसेच गोवा राज्यात दूध भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे मंत्री शेट्टर यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी यशस्वी मुन्या यांनी यावेळी कोरोना संदर्भात आपल्या खात्याचा अहवाल सादर केला. जिल्ह्यातील एकूण 383 जण निरीक्षणाखाली असून 318 जणांवर काॅरन्टाईन स्टॅम्पिंग करण्यात आल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील एकूण 21 संशयित रुग्णांचे वैद्यकीय नमुने कोरोना विषाणू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 18 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 3 रिपोर्ट प्रलंबित असल्याचेही डॉ. मुन्याळ यांनी सांगितले.
बैठकीप्रसंगी आमदार ॲड. अनिल बेनके, पोलीस आयुक्त लोकेशकुमार, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. आणि संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.