कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या कोरोना बाधित रुग्णांना आयसोलेटेड वॉर्डमध्ये ठेवून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे काॅरन्टाईन्ड रुग्णांदेखील हॉस्पिटलमधील वेगळ्या खास वॉर्डमध्ये ठेवले जावे, अशी मागणी बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष दीपक पवार यांनी जी – मेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
अत्यंत घातक अशा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्य शासन युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. यासाठी कोरोना बाधित रुग्णांना आयसोलेटेड वॉर्डमध्ये खास निगराणीखाली ठेवले जात आहे. याच पद्धतीने काॅरन्टाईनवर असलेल्या रुग्णांना देखील हॉस्पिटलच्या खास वॉर्डमध्ये शासनाच्या देखरेखीखाली ठेवले जावे. तसेच त्यांचा काॅरन्टाईनचा कालावधी संपेपर्यंत त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाऊ नये. कारण सध्या या काॅरन्टाईन्ड रुग्णांना स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य खात्याकडून काॅरन्टाईन दिलेल्या या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण घराबाहेर पडून सार्वजनिकांमध्ये मिसळताना दिसत आहेत. ही बाब संपूर्ण समाजासाठी घातक ठरू शकते. तेंव्हा यापुढे काॅरन्टाईन रुग्णांना देखील कोरोना बाधित रुग्णांनाप्रमाणे वेगळ्या खास वॉर्डमध्येच ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे, अशा आशयाचा तपशील दीपक पवार यांनी पंतप्रधानांना धाडलेल्या जी – मेलमध्ये नमूद आहे.