कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पालिका हद्दीतील तसेच अन्यत्र असणाऱ्या सर्व हॉटेल व रेस्टॉरंट्सनी रविवार दि. 22 मार्चपासून येत्या मंगळवार दि. 31 मार्चपर्यंत आपली डायनिंग सुविधा (भोजन व्यवस्था) बंद ठेवण्याचा आदेश कर्नाटक सरकारने दिला आहे. तथापि रेस्टॉरंट अथवा हॉटेलचे किचन खुले ठेवता येणार आहे जेणेकरून नागरिकांना फूड डिलिव्हरी ॲपद्वारे अन्नपदार्थ ऑनलाइन घरपोच मागवता येतील किंवा स्वतः येऊन घेऊन जाता येतील.
आरोग्य खात्याने नागरिकांना हॉटेल – रेस्टॉरंट सारख्या ठिकाणी जाणे टाळून फूड डिलिव्हरी ॲपद्वारे घरपोच अन्नपदार्थ मागून खाण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी हॉटेल अथवा रेस्टॉरंटचे किचन उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना नियाझ ग्रुपचे ईर्शाद सौदागर यांनी आम्ही नियाझ ग्रुपच्या आमच्या सर्व शाखा शनिवारी रात्रीपासून बंद करत आहोत. मात्र नागरिक आमच्याकडे स्वतः येऊन अन्नपदार्थ घेऊन जाऊ शकतात अथवा ऑनलाइन घरपोच अन्नपदार्थ मागू शकतात, असे सांगितले. पै बेकरीचे गिरीश पै यांनी आमच्या बेकरीच्या शाखा रविवार 22 मार्च वगळता इतर दिवशी नेहमीप्रमाणे सुरू राहतील असे सांगून सोमवार 23 मार्चपासून आम्ही मोबाईल बेकरी ही संकल्पना राबविण्याचा विचार करत आहोत असे स्पष्ट केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, नाईट क्लब, बार, पब्स, उन्हाळी शिबिरे, जलतरण तलाव, क्रीडास्पर्धा, लग्नसमारंभ, प्रदर्शन, परिषदा, चर्चासत्र आदींवर येत्या 31 मार्च 2020 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आता रविवार 22 मार्चपासून राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. आता रविवार 22 मार्चपासून राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे.