कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या देशव्यापी लॉक डाऊनमुळे विस्कळीत झालेले जनजीवन थोडेफार पूर्वपदावर यावे यासाठी बेळगाव महापालिकेने पोलीस खात्याच्या सहकार्याने खाद्यपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या रेस्टॉरंटचे कर्मचारी, ऑनलाइन औषध कंपन्याचे डिलिव्हरी बॉय आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कर्मचारी या सर्वांना त्यांचे काम करणे सुलभ जावे यासाठी खास परवाना पत्र अर्थात “पास” देण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव महापालिका आणि पोलिस खात्याकडून संयुक्तपणे दिल्या जाणाऱ्या या पासमुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑनलाईन औषध कंपन्या आणि हॉटेल – रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांपर्यंत त्यांची आवश्यक कागदपत्रे, औषधे, खाद्यपदार्थ आदी पोहचविण्यात कोणताही अडथळा येणार नाही. ज्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपले काम नेहमीप्रमाणे सुरळीत पार पाडता येणार आहे. महापालिका हद्दीतील किराणामालाची दुकाने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार असली तरी दुकानदारांनी ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स अर्थात सामाजिक अंतर राखले जाईल आणि गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
सध्या शहरातील काही मोजक्या रेस्टॉरंट मधून घरपोच सेवा दिली जात आहे. आता उद्यापासून पासेसचे वितरण झाल्यानंतर घरपोच खाद्यपदार्थ पार्सल देणाऱ्या रेस्टॉरंटची संख्या वाढणार असल्याने नागरिकांची चांगली सोय होणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास हरकत नाही. तथापि ही खरेदी करताना दुकानात अथवा मॉल्समध्ये गर्दी करू नये. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खरेदीच्या वेळी प्रत्येकाने एकमेकांमध्ये कटाक्षाने सोशल डिस्टन्स अर्थात सामाजिक अंतर राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे.
शहरातील नागरिकांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे. त्याचप्रमाणे जी कांही खरेदी असेल ती नजीकच्या (चालत जाता येईल इतक्या अंतरावरील) दुकानात अथवा मॉलमधून करावी. सध्या नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. “घरी रहा आणि सुरक्षित व्हा” असे आवाहनही मनपा आयुक्त जगदीश यांनी केले आहे.