प्राणघातक कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या आंतरराज्य प्रवासी वाहतुकीवर शनिवार दि. 21 मार्चपासून बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी जाहीर केले आहे.
करोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज शुक्रवारी जिल्ह्याच्या आपत्ती निवारण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. बोमनहळ्ळी यांनी उपरोक्त घोषणा केली. या घोषणेनुसार आता उद्या शनिवार 21 मार्च पासून परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांसह मॅक्सी कॅब, टॅक्सी , खाजगी बसगाड्या आदी अवजड प्रवासी वाहनांच्या महाराष्ट्र व गोवा या राज्यातील आंतरराज्य वाहतुकीवर बंदी असणार आहे.
शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित अन्य अधिकाऱ्यांना महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रवासी वाहतूकीवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
बेळगावहून महाराष्ट्र आणि गोव्याला जाणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेस ,मॅक्सिकॅब, टॅक्सी आणि खासगी बस गाड्यांची प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांच्या आदेशामुळे आता काही दिवस प्रवाशांना नाईलाजाने कुचंबणा सहन करावी लागणार आहे. दररोज बेळगावहून गोवा आणि महाराष्ट्रात बस जातात. या बसमधून हजारो प्रवासी नित्य प्रवास करतात. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महाराष्ट्र आणि गोव्याची बससेवा स्थगित करण्यात आली आहे. बस सेवा बंद झाल्यामुळे सीमावर्ती भागात उद्योग व्यवसाया निमित्त येणाऱ्या जाणाऱ्यांची पंचाईत होणार आहे.