हालगा (ता. बेळगाव) येथे खुलेआम गांजा – पन्नी विक्री करणाऱ्या एका ऑटोरिक्षा चालकाला रंगेहाथ पकडून हिरेबागेवाडी पोलिसांनी त्याच्याकडील 16,800 रुपये किंमतीच्या गांजा पन्नीसह मोबाईल, ऑटोरिक्षा असा एकूण 1 लाख 8,400 रुपयांचा मुद्देमाल काल बुधवारी रात्री जप्त केला.
सय्यद अली शहाबुद्दीन गवास (वय 30, रा. उज्वलनगर बेळगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या ऑटोरिक्षा चालकाचे नांव आहे. सय्यद हा काल रात्री 12.30 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 नजीकच्या हालगा गावातील आंबेडकर गल्लीमध्ये ऑटोरिक्षात बसून खुलेआम गांजा पन्नीची विक्री करत होता. यासाठी त्याने गांजा पन्नीची छोटी छोटी 84 पाकिटे तयार करून आणली होती.
याबाबतची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस उपायुक्त शिवारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक एम. एन. हंजीगेर यांच्या नेतृत्वाखाली हिरेबागेवाडी पोलिसांच्या एका पथकाने धाड टाकून सय्यद गवास याला रंगेहात पकडून गजाआड केले.
पोलीसांनी सय्यद यांच्याकडून जप्त केलेल्या गांजा पन्नीची किंमत 16,800 रुपये आणि एकूण मुद्देमालाची किंमत 1 लाख 8,400 रुपये इतकी होते. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.