सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी आपली संस्था फूड फॉर निडी तर्फे लॉक डाऊन कालावधीत पोलीस,डॉक्टर,नर्स आणि अन्य अत्यावश्यक सेवांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना चार दिवसाचा भाजीपाला पॅक करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.शहरात निरनिराळया ठिकाणी सेवा बजावत असलेल्या पोलिसांना त्यांच्या जागेवर जाऊन भाजीपाला देण्याचे कार्य सुरेंद्र अनगोळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आजपासून सुरू केले आहे.
अनेक पोलीस स्टेशनमध्ये जावून तेथील अधिकारी,कर्मचारी यांना भाजीपाला वितरित करण्यात आला.अनेक दवाखान्यात जावून डॉक्टर,नर्स,टेक्निशियन,वार्ड बॉय यांनाही भाजीपाला वितरित करण्यात आला.लॉक बंदीच्या काळात पोलिसांना सकाळी लवकर ड्युटीला बाहेर पडावे लागते आणि रात्री घरी यायला उशीर होतो.डॉक्टर आणि नर्स यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे.त्यामुळे यांना बाजारात जावून भाजीपाला खरेदी करणे शक्य नाही म्हणूनच पोलीस आणि डॉक्टर आदींना भाजीपाला वितरित करण्याचा उपक्रम राबविला असल्याचे सुरेंद्र अनगोळकर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.
भाजीच्या पाकिटात मिरची,दोडका,भोपळा,वांगी,कारली आदी भाजी देण्यात आली आहे.सोमवारी दोनशेहून अधिक भाजीपाला पाकिटे वितरित करण्यात आली.चार जणांच्या कुटुंबाला चार दिवस पुरेल इतकी भाजी एका पाकिटातून देण्यात येत आहे.जिल्हा रुग्णालयासमोर रुग्णांच्या नातेवाईकाना जेवण देणाऱ्या सुरेंद्र अनगोळकर यांनी लॉक डॉऊन काळात सेवा बजावणाऱ्याना भाजी वितरित केली आहे.