जीवघेण्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटत असणाऱ्या सरकारला मदत करण्यासाठी आता बेळगावच्या आश्रय फाउंडेशनच्या 6 कन्या पुढे सरसावल्या आहेत.
सध्या भारतासह जगभरात कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतच आहे. तथापि या कामी सहकार्य करण्यासाठी सर्वसामान्य जनताही पुढे सरसावू लागले आहे. आता महांतेश नगर बेळगांव येथील आश्रय फाउंडेशनमधील सहा अनाथ मुली ज्यांनी वयाची विशीही गाठलेली नाही त्यांनी कोरोना विषाणू विरोधात लढा देणाऱ्यांना तोंडाचे मास्क बनवून देण्याच्या स्वरूपात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर सहा मुली एचआयव्हीबाधित असल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, त्या आश्रय फाऊंडेशनच्या इमारतीमधून बाहेर पडू शकत नाहीत. इतके असून देखील देशाचे जबाबदार नागरिक यानात्याने आपल्या वेदना विसरून त्यांनी कोरोना विरुद्ध आपल्यापरीने लढाई सुरू केली आहे. या सहा मुलींनी आतापर्यंत 500 मास्कचे वितरण केले असून तोंडाचे मास्क बनविण्याचे त्यांचे काम अद्यापही सुरूच आहे.