बेळगाव जिल्हा रुग्णालय अर्थात बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमधील पीएनसी वाॅर्ड – 2 अर्थात प्रसूतीत्तोर विभाग क्रमांक 2 येथील अस्वच्छता सध्या टीकेचा विषय बनली आहे. परिणामी या ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमधील प्रसूतीत्तोर विभाग क्रमांक 2 अर्थात पीएनसी वॉर्ड या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून स्वच्छतेचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहे. नवजात बालक आणि त्यांच्या माता यांच्यासाठी प्रसूतीत्तोर विभाग अत्यंत निर्जंतुक आणि स्वच्छ वातावरण असावयास हवे. तथापि सिव्हिल हॉस्पिटल मधील पीएनसी वाॅर्ड – 2 मधील परिस्थिती वैद्यकीय क्षेत्राला मान खाली घालायला लावणारी आहे. सध्या या ठिकाणी चक्क बांधकामासंबंधित कामे केली जात आहेत.
सध्या बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमधील प्रसूतीत्तोर विभाग क्रमांक 2 अर्थात पीएनसी वॉर्डच्या एका कोपऱ्यात त्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाचा टाकाऊ चिखल मातीचा ढिगारा टाकण्यात आला आहे. परिणामी या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरण पसरलेले आहे. बांधकाम सुरू असल्यामुळे सदर वाॅर्डामध्येच कामगार आपली दुरुस्तीची कामे करत असतात. परिणामी याचा वॉर्डातील रुग्णांना प्रचंड त्रास होत आहे. या त्रासाव्यतिरिक्त वार्डात जे अस्वच्छ वातावरण पसरले आहे ते वेगळेच. त्यामुळे नवजात बालके आणि त्यांच्या मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या एकंदर परिस्थितीचे बेळगावातील कांही जागरूक नागरिकांनी चित्रीकरणही केले आहे.
सध्या सर्वत्र प्राणघातक कोरोना व्हायरस अर्थात कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्हा आरोग्य खात्यासह सिव्हील हॉस्पिटल पर्यायाने बीम्स प्रशासन यासंदर्भात सतर्क आहे ही स्तुत्य बाब आहे. तथापि सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील अन्य रुग्णांच्या आरोग्य सुरक्षा व्यवस्थेकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.