स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 21 दिवस आयोजित दिव्यांग आणि गोरगरीब मुलामुलींसाठीच्या 19व्या भव्य खास मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराची आज शनिवारी यशस्वी सांगता झाली.
गोवावेस येथील रोटरी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल येथे सलग 21 दिवस रविवार वगळता दररोज सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत हे शिबिर आयोजित केले गेले होते. याठिकाणी आज शनिवारी शिबिराच्या सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, आमदार अभय पाटील भाजप नेते ॲड. एम. बी. जिरली आणि स्विमर्स क्लबच्या संस्थापक अध्यक्षा माकी कपाडिया उपस्थित होत्या. त्याच प्रमाणे व्यासपीठावर उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे, सूर्यकांत हिंडलगेकर, मधुकर बागेवाडी, कल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते.
आपल्या समयोचित भाषण मंत्री शशिकला जोल्ले यांनी इतक्या भव्य शिबिराचे यशस्वी आयोजन करणाऱ्या उमेश कलघटगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल प्रशंसोद्गार काढले. दिव्यांगानी स्वतःला कमी लेखू नये असे सांगून शिबिरात भाग घेतलेल्या सर्व मुला-मुलींचे कौतुक केले. तसेच अद्वितीय अशा या शिबिराची माहिती आपण निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहोत, जेणेकरून त्यांच्याकरवी दिव्यांगाबद्दल विशेष आपुलकी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत या शिबिराची माहिती पोहोचू शकेल, असेही मंत्री शशिकला जोल्ले यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदर सांगता समारंभाचे औचित्य साधून विविध आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या बेळगावच्या 7 दिव्यांग जलतरणपटूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिबिरार्थींसह पालकवर्ग, हितचिंतक आणि क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
माहेश्वरी अंध मुलांची शाळा, आर्ष विद्या आश्रम, अंकुर स्पेशल स्कूल, आराधना स्पेशल स्कूल, स्पर्श स्पेशल स्कूल, गंगम्मा चिकुंबीमठ अनाथालय व सरकारी मूकबधिर शाळा या संस्थांमधील अपंग, अंध, मतिमंद मूकबधिर अशी दिव्यांग मुले – मुली तसेच गोरगरीब मुले अशा सुमारे 200 हून अधिक मुला-मुलींचा या मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिरात सहभाग होता. या शिबिरात त्यांना नियोजनबद्ध शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन जलतरण स्पर्धांसाठी तयार करण्यात आले आहे.
सदर मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांना रोटरी क्लब ऑफ बेळगाव, केएलई युनिव्हर्सिटी, जयभारत फाउंडेशन, पॉलीहायड्रॉन फाउंडेशन, डायमंड मेडल स्क्रीन, महेश फाउंडेशन, डॉ. अनंत जोशी (मुंबई), शिरीष गोगटे, रोशन सिंगनमक्की, आनंद केटर्स आदींचे सहकार्य लाभले.