कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्धपातळीवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून आजपासून विधानसभा, उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाची खंडपीठे, सचिवालय आणि शहर दिवाणी न्यायालयांसह विविध ठिकाणी लोकांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाणार आहे. बेळगाव दिवाणी न्यायालयातही तशी व्यवस्था केली जाणार आहे.
दरम्यान, थर्मल स्क्रीनिंगच्या स्कॅनर सारख्या उपकरणांची खरेदी सोमवारपर्यंत पूर्ण झाली असून स्कॅनर्स इतर वस्तूंची खरेदी कर्मचारी परिचारिकांची प्रतिनियुक्ती प्रशिक्षण ही सोमवारी पूर्ण करण्यात आले आहे. इतर कामे बाजूला ठेवून युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्याचा आदेश आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे आयुक्त पंकजकुमार पांडे यांनी जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे. नर्सिंग स्कूलमधील शहरी आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी यांचा उपयोग थर्मल स्क्रीनच्या कामासाठी केला जाणार आहे. यामुळे आजपासून बेळगाव दिवाणी न्यायालयासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लोकांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाणार आहे.
कोरोना विषाणूचे निदान करण्यात विलंब लागू नये यासाठी बेळगाव, मंगळूर, गुलबर्गा आणि हुबळी येथे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत. याखेरीज भविष्यात सर्व शासकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रयोगशाळा सुरू करण्याची सरकारची योजना आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड -19 वाॅररूम देखील सुरू करण्यात येणार आहे.