विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ अर्थात व्हीटीयुने कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्हायरस ई – लर्निंग प्लॅटफॉर्म वापरून “लर्न फ्रॉम होम” अर्थात “घरातून घ्या शिक्षण” ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.
देशातील “कोरोना” प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ अर्थात व्हीटीयुचे उपकुलगुरू डॉ. करीसिद्धप्पा यांनी व्हिटीयु ई – शिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे शुक्रवारी विद्यापीठाचे प्राचार्य, व्यवस्थापन मंडळ, व्हिटीयुशी संलग्न प्राध्यापक तसेच घटक आणि स्वायत्त संस्थांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केले. याप्रसंगी त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
प्राचार्यांनी प्रथम महाविद्यालयात येणाऱ्या सर्व मुलांना त्यांच्या त्यांच्या घरी अथवा गावी सुरक्षित जाऊ द्यावे. त्यानंतर नेहमीचे प्रशासकीय काम व्यवस्थित सुरू आहे की नाही ते पहावे, असे सांगून डॉ. करीसिद्धाप्पा यांनी आयसीटी आणि युट्युब लाईव्ह, गुगल क्लास, झूम ॲप आदी ई-लर्निंग प्लॅटफॉर्म वापरून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस घ्यावेत. तसेच दररोजच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा खोळंबा टाळण्यासाठी ऑनलाईन क्लासेसद्वारे असाइनमेंट, केस स्टडीज, प्रोजेक्ट वर्क आदी कामे मुलांना द्यावीत. प्राचार्यांनी आधुनिक आयसीटी प्लॅटफॉर्मचा वापर करून अभ्यासक्रम शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करावा असा सल्लाही त्यांनी दिला. त्याचप्रमाणे “लर्न फ्रॉम होम” ही संकल्पना कशी राबवायची याच्या कांही टिप्स देखील त्यांनी यावेळी दिल्या.
सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्हिटीयुशी संलग्न विविध संस्थांच्या सुमारे 166 प्राचार्यांनी सक्रिय भाग घेतला होता. यावेळी कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे गांभीर्य विशद करून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक संस्थेने घ्यावयाची खबरदारी याबाबत उपकुलगुरू डॉ. करीसिद्धाप्पा यांनी माहिती दिली. तसेच प्रत्येकाने पंतप्रधानांनी रविवारी जाहीर केलेला “जनता कर्फ्यू” आचरणात आणावा, असे आवाहनही त्यांनी सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकवर्गाला केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्हिटीयुचे रजिस्ट्रार डॉ. आनंद देशपांडे व डॉ. अन्नीगेरी हे उपस्थित होते. त्यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राचार्य व प्राध्यापकवर्गाशी संवाद साधला.