कोरोनाच्या धास्तीमुळे अख्खा देश घरात बसला असताना सोनार गल्ली वडगाव येथील जय गणेश युवक मंडळाला *कोरोना चॅलेंज* ही अभिनव आरोग्यदायी युक्ती सुचली आहे.
सध्या लाॅक डाऊनमुळे महिनाभर व्यायामशाळा बंद असल्यामुळे कोणालाही तेथे जाणे शक्य नाही. तेंव्हा यावर काय मार्ग? हा विचार करून सोनार गल्ली वडगाव येथील जय गणेश युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरीच व्यायामाचा कोणताही एक प्रकार करून गल्लीच्या ग्रुपवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
या ग्रुपमधील जवळपास सर्वच युवकांनी *कोरोना चॅलेंज* या शीर्षकाखाली चॅलेंज अर्थात आव्हान देणारे दंड, बैठक, सूर्यनमस्कार वगैरे व्यायामाचे स्पर्धात्मक व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. थोडक्यात दुसरा जेवढ्या दंडबैठका मारतो त्याहून जास्त दंडबैठका आपण दुसऱ्यादिवशी मारून दाखविणे. या पद्धतीने एकमेकांना चॅलेंज देण्याबरोबरच एकमेकांना तंदुरुस्त ठेवणे हा यामागचा उद्देश आहे.
सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्ष भेट जरी शक्य नसली तरी ग्रुपच्या माध्यमातून कोरोनामय परिस्थितीत मनोरंजनाबरोबरच जय गणेश युवक मंडळाचे *कोरोना चॅलेंज* आरोग्याच्या दृष्टीनेही फायद्याचे ठरणार आहे यात मात्र शंका नाही.