लॉक डाऊनच्या काळात सेवा बजावण्यासाठी जाणाऱ्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यातील एका पर्यावेक्षकाला पोलिसाकडून अमानुष मारहाण झाल्याच्या घटनेची पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित पोलिस कॉन्स्टेबलची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे पर्यवेक्षक बसवराज एस. डोळळण हे गेल्या 28 मार्च रोजी आपली सेवा बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या गांधिनगर येथील ओव्हरब्रिजच्या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या मल्लिकार्जुन मलसर्च या पोलीस कॉन्स्टेबलने धुळीण यांना तोंडावरील मास्क संदर्भात रस्त्यात अडविले. त्यावेळी बसवराज डोळळण यांनी आपले ओळखपत्र दाखवून परिचय देण्याचा प्रयत्न केला. तथापि पोलीस कॉन्स्टेबल मलसर्ज याने त्याकडे दुर्लक्ष करून धुळे इन यांना हातातील काठीने बेदम मारहाण केली. त्यामध्ये बसवराज डोळळण यांच्या हाताला विशेष करून बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. परिणामी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना लॉक डाऊनच्या काळात सेवा बजावण्यासाठी सूट दिली आहे. त्यामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असताना आरोग्य खात्याचे पर्यवेक्षक बसवराज डोळळण यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी माळमारुती पोलीस स्थानकाचा पोलीस कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन मलसर्ज याच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला आहे. सदर खातेनिहाय चौकशीनंतर मल्लिकार्जुन मलसर्ज याच्यावर कोणती कारवाई केली जाणार हे स्पष्ट होणार आहे.