बेळगाव महानगरपालिकेतील जन्म – मृत्यू दाखले विभागात पुन्हा एजन्ट राज सुरू झाले असून काही माजी नगरसेवक व त्यांचे नातेवाईक थेट कार्यालयात घुसून दाखले मिळवत आहेत, शिवाय कर्मचाऱ्यांवर दादागिरीही करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
महापालिकेच्या जन्म – मृत्यू दाखले विभागातून दाखले मिळवून देण्यासाठी पुन्हा एजंट राज्य सुरू झाले आहे. कांही माजी नगरसेवक व त्यांचे नातेवाईकच हे काम करीत असल्याचे बोलले जात असून यासाठी कौन्सिल विभागास समोरील प्रवेशद्वाराचा वापर केला जात आहे. यामुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. रांगेत थांबलेले यांचे अर्ज स्वीकारून दाखले द्यायचे की एजंटांचे काम आधी करायचे? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांचा समोर पडला आहे. याखेरीज थेट आत घुसणार्या माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांकडून कर्मचाऱ्यांवर दादागिरीही केली जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे नियमानुसार रांगेत थांबलेल्या नागरिकांना ताटकळावे लागत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते.
जन्म – मृत्यू दाखले विभागाची समस्या अद्याप सुटलेली नाही. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या भीतीने संपूर्ण महापालिका कार्यालय ओस पडले असले तरी जन्ममृत्यू दाखल विभागासमोरील गर्दी कमी झालेले नाही. दाखल्यांसाठी अर्ज करणे व वितरण करणे यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असून देखील दुपारी दीड पर्यंतच अर्ज स्वीकारले जात आहेत.
त्यानंतर दाखले तयार करण्याचे काम केले जात आहे. या विभागात अतिरिक्त कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली असली तरीही ही येथील समस्या सुटलेल्या नाहीत. दरम्यान, आता जन्म – मृत्यू नोंद थेट रुग्णालयातच करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी आधी नोंद झालेल्या माहितीच्या आधारे दाखले वितरण करण्याचे काम महापालिकेलाच करावे लागणार आहे.