घरची परिस्थिती बेताची असलेल्या स्वयम् कमलाकर घाडीगावकर या अनगोळ बेळगावच्या 9 वर्षीय मुलाला जन्मजात डी 5 – डी 6 हेमीव्हर्टिब्रा हा मणक्याचा गंभीर आजार झालेला असून त्याच्या शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपये इतका वैद्यकीय खर्च येणार असल्याने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
भाग्यनगर येथील मुक्तांगण हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या स्वयम् घाडीगावकर याचे वडील कमलाकर यांचा अनगोळ क्रॉस येथील बिग बझारसमोर खाद्यपदार्थांचा छोटा स्टॉल आहे. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. स्वयम् याला जन्मजात डी 5 – डी 6 हेमीव्हर्टिब्रा या व्याधीने ग्रासल्यामुळे त्याच्या मानेनजीक पाठीवर कुबड आहे. स्वयम् मला झालेली मणक्याची व्याधी ही अतिशय दुर्धर व्याधी असून त्यावर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
स्वयम् घाडीगावकर याची ही जन्मजात व्याधी वयानुसार इतकी बळावली आहे की गेल्या सहा महिन्यापासून त्याला साधे उभे राहता येत नाही, जे कांही करायचे ते रांगत रांगत करावे लागते. परिणामी सध्या त्याला परावलंबी जीवन जगावे लागत आहे. स्वयंमवर तात्काळ शस्त्रक्रिया केली नाही तर संबंधित व्याधी अधिक गुंतागुंतीची व धोकादायक ठरू शकते असे डॉक्टरांचे मत आहे.
स्वयम् च्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. ज्यामध्ये हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये 7 दिवसाचे आणि आयसीयूमध्ये एक दिवसाचे वास्तव्य औषधे शिवाजीनगर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी वैद्यकीय तपासणी आदी खर्चाचा समावेश आहे. तरी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी स्वयम् घाडीगावकर याच्यावरील उपचारासाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वयम् ला आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी कमलाकर गंगाधर घाडीगावकर बँक ऑफ इंडिया अंगोल रोड बेळगाव ब्रँच, अकाउंट नंबर – 111210110000680, आयएफएससी : बीकेआयडी 0401112 या ठिकाणी आपली मदत जमा करावी.