कोबी पिकाचा दर संपुर्णपणे कोसळल्यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. तेंव्हा सरकारने परित योग्य दरात कोबी खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्यातील कोबी उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कोबीचे गड्डे रस्त्यावर फेकून त्वरित योग्य दरात कोबीची खरेदी केली जावी या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव तालुक्यात कोबीचे पीक सर्वाधिक घेतले जाते तालुक्यात सुमारे 2 हजार हेक्टर म्हणजे सुमारे 5 हजार एकर जमिनीमध्ये कोबी पिकवला जातो. मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की बाजारपेठेत कोबीचा दर संपूर्णपणे कोसळला आहे. सध्या कोबीला प्रतिकिलो 50 पैसे इतका दर असल्यामुळे कोबी बाजारात आणण्याचा खर्चही शेतकऱ्यांना परवडणारा नाही. दर कोसळल्यामुळे शेतातील पूर्ण बहरात असलेल्या कोबी पिकाचे काय करायचे? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून अल्पावधीत पीक खराब होणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी उत्पन्नाची आशा सोडली आहे. कोबीचे पीक वाया जाण्यापेक्षा ते जनावरांच्या उपयोगी यावे म्हणून शेतकऱ्यांवर कोबीच्या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडण्याची वेळ आली आहे. कोबी पिकाचे एकरी उत्पादन काढायचे झाल्यास सुमारे 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो हे लक्षात घेता सध्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तेंव्हा सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा न मारता तात्काळ योग्य दरात बेळगाव तालुक्यातील कोबी उत्पादनाची खरेदी करावी, अन्यथा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे, अशा तपशील निवेदनात नमूद आहे.
गेल्या 2006 सालापासून आम्ही तालुक्यातील कोबी पिकासाठी सरकारने योग्य हमीभाव ठरवावा अशी मागणी करत आहोत. परंतु अद्यापपर्यंत याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दर कोसळल्यामुळे सध्या तालुक्यातील कोबी उत्पादक संकटात सापडले आहेत. आता सरकार कुठे आहे? लोकप्रतिनिधी कुठे आहेत? असा सवाल यावेळी संतप्त शेतकरी नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तसेच सरकारने त्वरित योग्य दरात कोबीची खरेदी करावी अशी मागणी केली. याप्रसंगी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.