बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाच्या बैठकीत मंजूर झालेला कार्यक्षेत्र वाढीचा प्रस्ताव आता शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी धाडण्यात आला आहे. या प्रस्तावाला शासनाचा हिरवा कंदील मिळाल्यास बुडाच्या कार्यक्षेत्रात आणखी 9 गावांची भर पडणार आहे.
बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाचे कार्यक्षेत्र बेळगाव शहर व तालुक्यात पसरले असून सध्या या कार्यक्षेत्रात शहरासह तालुक्यातील 27 गावे आहेत. आता या हद्द वाढीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यास त्यात आणखी नऊ गावांची भर पडणार असल्याने बुडाच्या कार्यक्षेत्रात एकूण 36 गावे येणार आहेत. हद्दवाढीच्या प्रस्तावानुसार बेळगाव शहराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागातील गावांचा बुडा कार्यक्षेत्रात समावेश केला जाणार आहे. यामुळे बुडाचे कार्यक्षेत्र पूर्वेला सांबरा पश्चिमेला कल्लेहोळ, मण्णूर तर दक्षिणेला येळ्ळूर व धामणे गावापर्यंत विस्तारले जाणार आहे.
सदर कार्यक्षेत्र विस्ताराचा प्रस्ताव 8 महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. नव्याने कार्यक्षेत्र समाविष्ट होणाऱ्या गावांमध्ये यापुढे बांधकामांना व मिळणार आहे त्याचप्रमाणे या गावाची “हद्द” तसेच “लँड यूज” देखील बोर्डाकडून निश्चित केली जाणार आहे. शासनाकडून बुडा हद्दवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात होणार असल्याचे बुडा आयुक्त प्रीतम नसलापूर यांनी सांगितले आहे.