यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांची कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी हनुमाननगर येथील आमदार सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच सत्कारही केला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच व कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स संघटनेचे सरचिटणीस अजित सिद्दण्णावर, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम. के. गुरव, राष्ट्रीय पंच व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस एम. गंगाधर, सुनील राऊत, राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर, रोहित, चव्हाण, केदार पाटील व राष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटू कु. केतकी पाटील आदी उपस्थित होते.
आमदारांच्या सत्काराचे औचित्य साधून नॅशनल लेव्हल फिटनेस फॉर वुमन शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कु. केतकी पाटील हिच्यासह विविध राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या प्रताप कालकुंद्रीकर, रोहित चव्हाण व केदार पाटील यांचा आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार जारकीहोळी यांनी बेळगावच्या या शरीरसौष्ठवपटूंनी राष्ट्रीयस्तरावर मिळवलेले पुरस्कार पाहून कौतुकोद्गार काढले, तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी सुयश चिंतले.