बेभरवशाच्या वेळापत्रकामुळे नव्या बेळगाव ते वास्को व्दी साप्ताहिक पॅसेंजर रेल्वे गाडीची लोकप्रियता घसरली असून या रेल्वेसंदर्भात नैऋत्य रेल्वे प्रशासनाचा दृष्टिकोनही उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
निसर्गरम्य मार्गाने जाणाऱ्या आणि प्रेक्षणीय दूध सागर धबधब्यांच्या ठिकाणी थांबा घेणाऱ्या बेळगाव ते वास्को द्वि साप्ताहिक पॅसेंजर रेल्वेगाडीने प्रारंभी बरीच लोकप्रियता मिळवली होती. परंतु आता इतर पॅसेंजर रेल्वेच्या तुलनेत सदर पॅसेंजर रेल्वे सेवेला विविध कारणास्तव नावे ठेवली जात आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी रेल्वे सेवेबाबतच्या प्रलंबित मागण्या निकालात काढताना बेळगाव होऊन बेळगाव – वास्को साप्ताहिक पॅसेंजर रेल्वेगाडीसह अन्य कांही नव्या रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरू केलेली बेळगाव – वास्को व्दी साप्ताहिक पॅसेंजर रेल्वे अल्पावधीत लोकप्रिय बनली होती. बेळगाव ते गोवा दरम्यानचा भयानक रस्तेमार्ग हे या लोकप्रियतेचे मुख्य कारण होते. ही पॅसेंजर रेल्वे बेळगावची बाजारपेठ आणि गोवा पर्यटन उद्योग यांनाही चांगली चालना देणारी ठरेल, अशी अपेक्षा होती. तथापि अलीकडे या रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
गेल्या वर्षी 5 सप्टेंबर रोजी वास्को (गोवा) येथून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि नैऋत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बेळगाव व गोव्यातील आमदारांच्या उपस्थितीत बेळगाव – वास्को साप्ताहिक पॅसेंजर रेल्वेचा शुभारंभ झाला होता. एकंदर आठ डबे (बोगी) असणारी ही रेल्वे सकाळी बेळगावहून सुटायची आणि वास्कोहून दुपारी निघून सायंकाळी बेळगावला पोहोचत होती. तथापि गोवा आणि बेळगावातील प्रवाशांच्या सोयीसाठी अल्पावधीत या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार ही रेल्वे सकाळी 6.05 वाजता वास्कोहून सुटायची आणि बेळगावला सकाळी 11.30 वाजता पोहोचायची, त्यानंतर बेळगावहून दुपारी 12.30 वाजता सुटायची आणि वास्कोला सायंकाळी 6.20 वाजता पोहचायची. मात्र अलीकडच्या काळात हे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सदर रेल्वे दोन्ही रेल्वेस्थानकांवर अघोषित उशिरा पोहोचत असल्यामुळे या रेल्वेसेवेची मागणी कमी झाली आहे. परिणामी नैऋत्य रेल्वेकडून ही रेल्वेसेवा बंद केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे आता या पॅसेंजर रेल्वेचे चार डबे कमी करण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात अवांछीत उशीर करणे अथवा वेळेवर न सुटणे असे प्रकार या रेल्वेकडून होत असल्यामुळे प्रवाशांचे या रेल्वेतील स्वारस्य कमी झाले आहे. कनकोलिम (गोवा) ते खानापूर असा दररोज प्रवास करणाऱ्या लुइस लिमा यांच्या मते बेळगाव वास्को द्वि साप्ताहिक पॅसेंजर रेल्वेच्या बेभरवशाच्या सेवेची नैऋत्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. त्यांनी या प्रकरणी त्वरित कार्यवाही करून सदर रेल्वे पूर्वीप्रमाणे वेळापत्रकानुसार धावेल अशी व्यवस्था केली पाहिजे.
आमच्या मागणीसह आठवड्याअखेर बेळगावला भेट देणार्या गोव्यातील प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी ही रेल्वेसेवा सुरू केली त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आमची अपेक्षा आहे की ही रेल्वे गाडी लोकप्रिय होऊन आठवड्याअखेर खरेदीसाठी बेळगावला येणाऱ्या गोवेकरांचा आनंद द्विगुणित करेल. खरेतर ही रेल्वे सेवा दररोज उपलब्ध केली गेली पाहिजे. परंतु सध्याचे या रेल्वेचे बेभरवशाचे वेळापत्रक आणि त्याकडे रेल्वे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यावरून सदर रेल्वे सुरू ठेवण्यात प्रशासनाला स्वारस्य दिसत नाही असे वाटत आहे, असे लिमा यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याशी संपर्क साधला असता आपण या संदर्भात तात्काळ लक्ष घालून दोन्ही राज्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक ते क्रम घेण्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगू असे आश्वासन मंत्री अंगडी यांनी दिले आहे.