अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर आयोजित रविवार दिनांक ८ मार्च २०२०रोजी महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांची निवड करण्यात आली आहे.
मराठा मंदिर सांस्कृतिक भवन येथे हे एक दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले असून एकूण चार सत्रामध्ये हे संमेलन संपन्न होणार आहे अशी माहिती राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.
यावेळी बैठकिला बेळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण , उपाध्यक्ष डी.बी.पाटील, सचिव रणजीत चौगुले , कार्याध्यक्ष महादेव चौगुले , महिला जिल्हाध्यक्षा साधना सपारे , उपाध्यक्षा अरूणा पाटील , सचिव स्मिता चिंचणीकर यासह कार्यकारणी उपस्थित होती.
पहिल्या सत्रात रामदास फुटाणे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
बऱ्याच वर्षानंतर वात्रटिकाकार रामदास फुटाणे बेळगावला येणार असल्यामुळे साहित्य रसिकांच्या त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. लेखक, चित्रपट, निर्माता, दिग्दर्शक, कवी, चित्रकार व वात्रटिकाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सामना, सर्वसाक्षी, सुर्वंता, सरपंच भगीरथ अशा अनेक चित्रपटाचे ते निर्माते व दिग्दर्शक आहेत. भारत कधी कधी माझा देश आहे या कार्यक्रमामुळे तसेच सामना चित्रपटामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. कटपीस, सफेद टोपी लाल बत्ती, चांगभलं, फोडणी, कॉकटेल, भारत कधी कधी माझा देश आहे हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून महाराष्ट्र तसेच परदेशातही त्यांचे भाष्य कवितांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले असून 2002 पासून जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ते उपाध्यक्ष आहेत. 1996 ते 2000 या कालावधीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
दुसरे सत्र निमंत्रितांचे कविसंमेलन असणार आहे, यामध्ये ज्येष्ठ कवी चंद्रकांत पोतदार (कोल्हापूर), अलका तालनकर (अमरावती), अभिषेक अवचार (वाशिम) व इतर कवी सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात मराठी भाषेसाठी माध्यमांचे योगदान यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये जय महाराष्ट्र चॅनल चे संपादक सुरेश ठमके (मुंबई) शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व यांना एनयुजे महाराष्ट्राच्या राज्याध्यक्ष शीतल करदेकर सहभाग घेणार आहेत. चौथे सत्र मनोरंजनातून प्रबोधन असणार असून पुणे येथील कल्पना देशपांडे यांचा अस्सा नवरा हा खुमासदार असा एकपात्री कार्यक्रम होणार आहे.
यावेळी साहित्य परिषदचे कार्यकारणी सदस्य एम.वाय. घाडी , संजय गुरव , मोहन अष्टेकर ,सुरज कणबरकर , गणेश दड्डीकर , संदिप तरळे , संजय गौडाडकर, मोहन पाटील व स्वप्निल जोगाणी उपस्थित होते.