सरकारी हॉस्पिटल मधील व्हेंटिलेशन सुविधा असलेले वीस टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखून ठेवण्याचा आदेश आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी बजावला आहे.कोरोना संदर्भात मंत्री श्रीरामलू यांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली.कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्या संबंधी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही.सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करा.कोरोना संबंधी जनतेत जागृती करा.कोरोना बाबत उपचार करण्यासाठी कोणतीही हयगय करू नका.कर्नाटकात कोरोनाचा 17 रुग्ण आहेत.परदेशातून आलेल्या व्यक्तींना आरोग्य खात्याच्या निगरानीखाली ठेवण्यात आले आहे.मंगलोर भागातील बाहेरून येणारे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत अशी माहितीही मंत्री श्रीरामलू यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला असून तेथे 15 बेडची व्यवस्था असून के एल इ हॉस्पिटलमध्ये देखील आयसोलेशन वार्ड सज्ज ठेवण्यात आला असून तेथे 16 बेडची सोय असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.याशिवाय खासगी रुग्णालयात देखील व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 17
बेळगावात लवकरच कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा स्थापण्यात येणार असल्याची ग्वाही देण्याबरोबरच राज्यात आजपर्यंत 17 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री श्रीरामलू यांनी शनिवारी दिली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामधील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बेळगावला आले असता बेळगावला वगळून कोरोना प्रयोगशाळा हुबळी येथे का स्थापन केली जात आहे असा प्रश्न पत्रकारांनी केला असता आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी उपरोक्त ग्वाही दिली. ते पुढे म्हणाले की, बेळगाव शहर हे महाराष्ट्राच्या सीमानजीक असल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्त रुग्ण याठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बेळगावात लवकरच कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू केली जाईल. राज्यात कालपर्यंत आढळून आलेल्या 15 कोरोना विषाणू बाधितांपैकी तिघाजणांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात राज्यातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून मी स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांच्या साथीने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत राज्यांमध्ये सुमारे 1.50 लाख लोकांची कोरोना संदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 15 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून आज आणखी दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस जाण्यापुर्वी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तैनात केलेल्या वैद्यकीय पथकाकडून आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी आपली थर्मल स्क्रीनिंगद्वारे वैद्यकीय तपासणी करून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीमध्ये आरोग्यमंत्र्यांनी उपस्थित आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसह विविध अन्य खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात अंमलात आणलेल्या उपाय योजनांबद्दल माहिती घेतली. तसेच यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शनही केले. दरम्यान, आता हुबळी प्रमाणेच बेळगावला देखील कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींसह सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.