लॉक डाऊनच्या निर्णयानंतर बँका सुरू राहतील की नाही? असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. तथापि आता बेळगाव शहर व तालुक्यातील बँका सुरू झाल्या असल्या तरी “कोरोना”च्या धास्तीमुळे बँकेत ग्राहक नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
लॉक डाऊनच्या काळात नागरिकांना आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी प्रशासनाच्या नियमावलीनुसार दुपारपर्यंत बँका सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र बँकांमध्ये देखील कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी काऊंटरपासून कांही अंतरावर दोऱ्या बांधण्यात आल्या असून ग्राहकांना दुरूनच व्यवहार करण्यास सांगितले जात आहे. सद्य परिस्थितीत ग्राहकांना पैशाची चणचण भासू नये यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँका सुरू झाल्या आहेत. बँकांनी आपले इतर व्यवहार बंद ठेवले असले तरी पैसे भरणे व काढणे हा व्यवहार मात्र सुरू ठेवला आहे.
बँका सुरू ठेवण्यासाठी 50% कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आले आहे. ग्राहकांची एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक बँकेमध्ये सामाजिक अंतराचे मार्किंग करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने मोजक्याच ग्राहकांना बँकेत प्रवेश दिला जात आहे. सोमवारी शहरातील काही बँकांमध्ये तुरळक प्रमाणात ग्राहक दिसून आले.
दरम्यान, लॉक डाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना बँकांत पर्यंत ये-जा करणे शक्य नसल्यामुळे एटीएम चा पर्याय उपयुक्त ठरला आहे. तथापि चलन नसल्यामुळे शहर व उपनगरातील बहुतांश एटीएम बंद ठेवण्यात आले असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. खरं तर प्रत्येक बँकेचे एटीएम सुरू राहिल्यास बँकेमध्ये होणारी ग्राहकांची गर्दी टाळता येणार आहे. तेंव्हा बंद असलेले एटीएम संबंधित बँकांनी लवकरात लवकर सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.