नेहमी वाहतुकीची कोंडी होत असलेल्या एपीएमसी जवळील संगमेश्वर नगर चौकातील सुरु करण्यात आलेला सिग्नल बंद ठेवण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. वाहतुकीची कोंडी वारंवार होत असताना देखील हा सिग्नल बंद का करण्यात आला असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या ठिकाणी एक रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
बेळगाव येथील एपीएमसीमध्ये भाजी मार्केट हलवल्यापासून वारंवार येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत संगमेश्वर नगर चौकात सिग्नल बसविण्यात आला होता. त्यामुळे वाहतुक सुरळीत झाली होती. मात्र आता पुन्हा त्या ठिकाणचा सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे.
या रस्त्यावर ड्रेनेज पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू होती. आता ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम अंतिम टप्प्यात असून दोन्ही बाजूनेही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र सिग्नल बंद पडत असल्याने शनिवार आणि बुधवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणचा सिग्नल निदान दोन दिवस तरी सुरु करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भाजी मार्केट आणि एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असते. ते संगमेश्वर चौकातून एपीएमसी कडे जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने याठिकाणी वाढवणार गर्दी उसळत असते. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल सुरू ठेवणे गरजेचे होते. मात्र मोजकेच दिवस सिग्नल सुरू ठेवून ते पुन्हा बंद करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे हे सिग्नल पुन्हा सुरू करावे अशी मागणी होत आहे.