वैद्यकीय क्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली आहे. तंत्रज्ञान बदलले आहे. बेळगाव सिव्हील हॉस्पिटल याला अपवाद नाही. वैद्यकीय क्षेत्रात डायलेसीस विभाग हा रुग्णांसाठी सपोर्ट सिस्टीम म्हणून खूप महत्वाचा ठरतो. गेल्या 10 वर्षांत सिव्हिल हॉस्पिटलमधील या विभागाने 30 हजार 555 रुग्णांवर डायलेसीसचा उपचार केला आहे, ही उल्लेखनिय बाब आहे, असे मत बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी व्यक्त केले.
सिव्हिल हॉस्पिटलमधील डायलेसीस विभागाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर सिव्हिल सर्जन डॉ. हुसेनसाब काझी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश दंडगी, डायलेसिस विभाग सुरु करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या डॉ . अर्चना व विद्यमान डायलेसिस विभाग प्रमुख डॉ . सतीश पाटील उपस्थित होते . ‘ प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर केक कापण्यात आला. तसेच डॉ. अर्चना डंबळ यांचा त्यांच्या डायलिसिस केंद्रासाठीच्या भरीव योगदानाबद्दल डॉ. विनय दास्तीकोप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. अर्चना डंबळ म्हणाल्या , 10 वर्षांपूर्वी हा विभाग सुरु करताना आम्हाला प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर जावे लागले. तेंव्हा आम्ही सगळेच नवखे होतो. परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकमेकांच्या सहकार्याने संघटितपणे आम्ही काम करु लागलो. त्यामध्ये प्रशासनाचे सहकार्यही महत्वाचे ठरले.
यावेळी बोलताना डॉ. काझी म्हणाले, प्रत्येक रुग्णाची मानसिकता वेगळी असते. तशीच त्याची प्रतिकार शक्ती देखील वेगळी असते. डायलेसीस विभाग हा आमच्या हॉस्पिटलचा उत्कृष्ट विभाग आहे. रुग्णांची संख्या पाहता त्याची गरज वाढणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगून प्रत्येक आमदारांना डायलेसीस यूनीट सुरु करण्यासाठी मान्यता देण्याचा अधिकार असल्याची माहितीही डॉ. काझी यांनी यावेळी दिली.
अध्यक्षीय भाषणात डॉ . विनय दास्तीकोप म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असले तरी त्याहीपेक्षा रुग्णांचा डॉक्टरांवर असणारा विश्वास खूप महत्वाचा आहे. अलिकडच्या काळात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून हा विश्वास जपणे महत्वाचे आहे. डायलेसीससाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात येता हा विभाग २४ तास कार्यरत ठेवण्याचा विचार आहे. महत्वाची बाब म्हणजे अन्य राज्यांचे रुग्णसुध्दा येथे येतात. त्यामुळे लवकरच या विभागाचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. विनय दास्तीकोप यांनी दिली.
अत्यंत गंभीर स्थितीमध्ये रुग्णांसमोर अवयवरोपण किंवा डायलेसीस हे दोन पर्याय असतात . सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलेसीस विभाग सुरु करणे हे तसे सोपे नाही . परंतु 10.5 वर्षे हा विभाग अत्यंत उत्तम तऱ्हेने कार्य करत आहे . याचे कारण हॉस्पिटलने जपलेला रुग्णांचा विश्वास. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये विश्वासाचे नाते असणे महत्वाचे आहे . रुग्णांना हा विश्वास आम्ही देवू शकलो ही महत्वाची बाब असल्याचे डॉ. दोस्तीकोप यांनी सांगितले.
रुग्णांच्यावतीने अस्लम यांनी बोलताना या विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी आम्हाला कुटुंबियांप्रमाणे वागवितात, असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी निमंत्रितांसह डॉ. शिवकुमार, डॉ. असिम, डॉ. प्रशांत, डॉ. निंबाळ, डॉ. अथणी, डॉ. आसीफ, मेट्रन कमला मादीग, ज्येष्ठ परिचारीका विमला पाटील, सुषमा, कर्मचारी अशोक, विनोद, शशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमरनाथ यांनी केले.