एसपीएम रोड शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूलमधील जूनियर आणि सीनियर केजी मुलांच्या हस्तकला प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सकाळी उत्साहात पार पडला.
गजाननराव भातकांडे हायस्कूलच्या सभागृहामध्ये सदर हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात हायस्कूलमधील ज्युनिअर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांनी तयार केलेली भेट कार्डे, बालसुलभ चित्रे तसेच विविध वस्तू मांडण्यात आल्या आहेत. सदर प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज सकाळी प्रमुख पाहुण्या डॉ. अनुपमा जोशी आणि डॉ. राजश्री मिसाळे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी गजाननराव भातकांडे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, गजाननराव भातकांडे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका दया शहापूरकर आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून कौतुकोद्गार काढले.
प्रदर्शनाचा अनुभव अत्यंत छान होता. लहान मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून सुंदर काम करून घेतल्याबद्दल शिक्षकवर्गाचे अभिनंदन. मुलांना अभ्यासाबरोबरच अन्य कौशल्य आणि उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले गेले पाहिजे. त्यामुळे बालवयापासून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत होते, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. अनुपमा जोशी यांनी व्यक्त केली.
डॉ. राजश्री मिसाळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शिक्षकांनी मुलांच्या अंगभूत कौशल्याचा विकास करण्यासाठी या प्रदर्शनाद्वारे जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत स्तुत्य असून याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे, असे सांगितले. अशा प्रदर्शनामुळे फक्त अभ्यासात गुरफटू न पडता मुले आपल्या अंगभूत कलाकौशल्याचा विकास साधू शकतील असे मतही डॉ. मिसाळे यांनी व्यक्त केले. प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी शाळेतील शिक्षकवर्गासह पालक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.