सुळेभावी येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री शिवशोभा सिने फॅक्टरीने तयार केलेल्या “जात्री बंतू” या कन्नड लघुपटाचा उद्घाटन समारंभ गेल्या शनिवारी उत्साहात पार पडला.
सुळेभावी येथे आयोजित सदर लघुपटाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष देवण्णा बंगेनावर हे होते. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार संजय पाटील, लघुपटाचे निर्माते व पत्रकार भैरु कांबळे, भाजपचे ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव, ता.पं. सदस्य बसनगौडा मुक्रीपाटील, डॉ. डी. एस. चौगुले, किरणसिंग रजपूत, नानप्पा पार्वती, मुर्गेश शिवपूजी आणि शिवप्पा कोतकर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करण्यात आल्यानंतर मंत्री रमेश जारकीहोळी व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने लघुपटाचे उद्घाटन झाले.
सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी या एकच असून दोघांच्यात कोणताही फरक नाही, दोघीही जागृत आहेत असे मंत्री जारकीहोळी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. दर पाच वर्षातून एकदा होणारी सुळेभावीची श्री महालक्ष्मी यात्रा येत्या 10 ते 18 मार्च दरम्यान होणार असून ही यात्रा शांततेत उत्साहाने साजरी करा. या भागातील ही सर्वात मोठी जत्रा असून लाखो भाविक या यात्रेनिमित्त सुळेभावीला येत असतात. यानिमित्ताने “जात्री बंतू” या लघुपटाद्वारे सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीचा महिमा देशभरात पसरू दे, अशी शुभेच्छाही पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या भाषणात सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीच्या महिमेमुळेच मी आमदार झाले, माझे कोणतेही महत्वाचे काम मी या देवीचे दर्शन घेतल्याशिवाय सुरु करत नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेप्रसंगी लागणाऱ्या आवश्यक मूलभूत नागरी सोयी-सुविधांसाठी अनुदान मंजूर केले आहे. सुळेभावी बस स्थानकासाठी 2 कोटी मंजूर झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था भंग न करता यात्रोत्सव यशस्वी करा, असे आवाहन करून आमदार हेब्बाळकर यांनी यात्रोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
“जात्री बंतू” लघुपटाच्या उद्घाटन समारंभास सुळेभावी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांसह सुळेभावी येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. “जात्री बंतू” हा कन्नड लघुपट सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी महिमेवर आधारित असून बाबासाहेब कांबळे, स्नेहा पाटील, समृद्ध कळसप्पगोळ व बालराज भजंत्री यांच्या या लघुपटात प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे सदर कन्नड लघुपटात भूमिका करणारी स्नेहा पाटील ही मराठी मुलगी असल्याचे लघुपटाचे निर्माते पत्रकार भैरू कांबळे यांनी आवर्जून सांगितले.