लग्नाचा खर्च न परवडणाऱ्या गोरगरिबांसाठी राज्य शासनाने “सप्तपदी” ही सामुहिक योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील धर्मादाय खात्याच्या मंदिरांमध्ये येत्या 26 एप्रिल 2020 रोजी सामूहिक विवाह होणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तीन मंदिरांमध्ये हा सामूहिक विवाह होणार असून त्याकरिता नांव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
गोरगरिबांना मदतीच्या उद्देशाने तसेच लग्न काळात होणाऱ्या वायफळ खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने सामूहिक विवाह योजना जारी केली आहे. सप्तपदी या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत 26 एप्रिल रोजी धर्मादाय खात्याच्या सर्व “अ” दर्जा मंदिरांमध्ये या विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाणार आहे. या योजनेद्वारे प्रत्येक जोडप्यासाठी 55 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. वरासाठी फुलांचा हार, धोतर, उपरणे याकरता 5 हजार रुपये. वधूला हार, साडी आदींसाठी 10 हजार रुपये. त्याचप्रमाणे सोन्याचे मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी 40 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. या मंगळसूत्राचे वजन सुमारे 8 ग्रॅम असणार आहे. विवाह सोहळ्यात सहभागी दोन्ही बाजूच्या वऱ्हाडींसाठी मोफत जेवणाची सोय केली जाणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे सामूहिक विवाह होतील. त्यासाठी धर्मादाय खात्यासह इतर खात्यातील अधिकारी सहकार्य करणार आहेत. राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर धर्मादाय खात्याचे मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सप्तपदी योजनेची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनुसार राज्यात दरवर्षी दोन वेळा धर्मादाय खात्याच्या सर्व “अ” दर्जा मंदिरांमध्ये सामूहिक विवाह यांचे आयोजन केले जाणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा डोंगरावरील श्री रेणुका देवी मंदिर, रायबाग तालुक्यातील गोडची येथील श्री वीरभद्र मंदिर आणि रायबाग तालुक्यातील चिंचोली येथील श्री मायक्का देवी मंदिरामध्ये येत्या 26 एप्रिलला शासनाचा हा “सप्तपदी” सामुहिक विवाह सोहळा होणार आहे. त्याकरिता या मंदिरांमध्ये नांव नोंदणीला सुरुवात झाली आहे. इच्छुकांसाठी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी 1800 – 4256654 या क्रमांकावर मोफत संपर्क साधण्याची सोय करून देण्यात आली आहे.