गुजरात येथे आयोजित आंतर भारतीय विद्यापीठ रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा 2019 – 20 या स्पर्धेत बेळगावच्या रोहन कोकणे याने अभिनंदनीय यश मिळविले.
गुजरात येथील आरआयएमटी युनिव्हर्सिटी मंडी गोविंदघर या विद्यापीठाने भारतीय विद्यापीठ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 11 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आंतर भारतीय विद्यापीठ रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर रोहन अजित कोकणे याने रौप्य पदक पटकाविले.
रोहन कोकणे हा शहरातील जीआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेली तेरा वर्षे तो केएलई सोसायटीच्या लिंगराज कॉलेज स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड केंद्रीय शाळेच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंगवर स्केटिंगचा सराव करतो. त्याला प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी आणि विशाल वेसणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याचप्रमाणे केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग असोसिएशनचे सरचिटणीस पी. के. भरतकुमार, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल रोहन कोकणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.